मुख्यमंत्री शिवसेनेचा, रुबाब राष्ट्रवादीचा ; तानाजी सावंत डिस्कनेक्‍ट, आमदार प्रभुंवर सोलापूरची धुरा 

प्रमोद बोडके
Wednesday, 29 July 2020

ज्या मतदार संघात सेना उमेदवाराचा पराभव झाला आहे, तेथील प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी माझी नेमणूक झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालय, राज्य सरकार व त्या मतदार संघातील सेना पदाधिकारी यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. लवकरच मी सोलापूरचा दौरा करणार आहे. 
- सुनील प्रभू, आमदार, शिवसेना 

सोलापूर : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असले तरीही राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात सत्तेचा रुबाब मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच दिसत आहे. कोरोनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यावर ओढवलेल्या संकटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि नेते ज्या पद्धतीने क्रियाशील दिसले तशी तत्परता शिवसेनेच्या मंत्र्यांची दिसली नाही. भाजपच्या तुलनेत सोलापूर जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भाजपने राजकीय पर्याय दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना मात्र ना सत्तेत ना विरोधात अशा विचित्र स्थितीत अडकली आहे. 

कोरोनाच्या संकटात सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूरचा दौरा केला. त्यामुळे कोरोनाच्या संकटात राष्ट्रवादीने सोलापूर जिल्ह्याशी असलेले नाते अधिक घट्ट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे एकेकाळी 4-4 आमदार विधानसभेत जात होते. 2014 मध्ये करमाळ्यातून नारायण पाटील आणि 2019 मध्ये सांगोल्यातून शहाजी पाटील यांना आमदारकीची संधी मिळाली. हे दोन्ही सोलापूर जिल्ह्याच्या एका टोकाचे आणि आमदारकीच्या शर्यतीत हजार मतांच्या आत पास झालेले आहेत हे विशेष. सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख परंड्याचे शिवसेना आमदार तानाजी सावंत हे विधानसभा निवडणुकीपासून सायलेंट मोडवर आहेत. त्यातच त्यांच्या मंत्रिपदाची संधी हुकल्याने सोलापूरच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी कोणाकडे आहे? याचाच विसर सर्वांना पडला आहे. 

जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आता मुंबईतील सेना आमदार सुनील प्रभू यांच्यावर सोलापूर जिल्ह्याची धुरा सोपविली आहे. शहर मध्य, करमाळा, बार्शी, मोहोळ, माढा या पाच विधानसभा मतदार संघात शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला आहे. तेथील विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार प्रभू काम पाहणार आहेत. 

क्षीरसागर यांच्या माध्यमातून खदखद बाहेर 
शिवसेना उमेदवार ज्यांच्या विरोधात लढले आणि पराभूत झाले, तेच कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदार सत्तेत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या माध्यमातून शिवसैनिकांचे कामे व शिवसैनिकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न होत नसल्याची खदखद शिवसैनिकांच्या मनात होती. मोहोळचे शिवसेना उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांनी हा विषय मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत मांडला. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन आगामी निवडणुका व विकास कामे दोन्हीही सुकर करण्यासाठी आमदार प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
बंडखोरांना मिळतोय आश्रय 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, शहर मध्य, मोहोळ या विधानसभा मतदार संघात शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. त्यामुळे या तिन्ही हक्काच्या जागा शिवसेनेला गमवाव्या लागल्या आहेत. या तिन्ही ठिकाणी ज्यांनी बंडखोरी केली त्या ठिकाणच्या बंडखोरांवर शिवसेनेच्यावतीने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे जिल्ह्यातील खरी शिवसेना कोणाची? बंडखोरांची की ज्यांनी पक्षाच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविली त्यांची? याचे उत्तर अद्यापही कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister of Shiv Sena, impression of NCP; Tanaji Sawant disconnected, MLA Prabhu on the charge of Solapur