मुंबई - महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार- २०२४’ ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली. २५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरवर्षी हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो. यंदा शिल्पकलेतील अतुलनीय योगदानासाठी राम सुतार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार असून त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला शिल्पांच्या माध्यमातून अमरत्व बहाल केले आहे.
त्यांनी साकारलेली गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांची १८२ मीटर उंचीचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. याशिवाय, महात्मा गांधी यांचे अनेक पुतळे, चंबळ स्मारक, बंगळूर विमानतळावरील केम्पेगौडा पुतळा अशा अनेक स्मारकाच्या माध्यमातून त्यांनी देशभरात आपल्या शिल्पकलेची छाप सोडली आहे.
वयाच्या शंभराव्या वर्षीही ते शिल्पकलेत कार्यरत आहेत, हीच त्यांच्या समर्पणाची खरी ओळख आहे. १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात जन्मलेल्या सुतार यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले. त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या निर्मितीने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली. आजही ते आपल्या स्टुडिओत नव्या शिल्पांवर काम करत आहेत.
सुतारांनी देशाचा गौरव वाढविला
‘‘राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेतून महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या कलाकृती जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करतात. ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ साठी त्यांच्या नावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.” हा पुरस्कार त्यांना लवकरच एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सर्वपक्षीय सदस्यांनी सुतार यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “राम सुतार हे महाराष्ट्राचे खरे रत्न आहेत. त्यांचा हा सन्मान म्हणजे आम्हा सर्वांचा गौरव आहे.”
भारतातील सर्वात वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि कला तपस्वी शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना २०२४ चा ''महाराष्ट्र भूषण'' हा पुरस्कार आम्ही जाहीर केल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे, आपली सारी कला आणि सर्जनशीलता भारतीय संस्कृती आणि परंपरांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी समर्पित करणाऱ्या कलामहर्षी सुतार यांचे या पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या कलासाधनेला शतशः प्रणाम!
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचे प्रतीक आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे. त्यांची प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
‘...हा तर हिंदुस्थान भूषण सन्मान’
नवी दिल्ली - ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण सन्मान जाहीर झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नव्हे तर हिंदुस्थान भूषण पुरस्कार आहे,’’ अशा शब्दांत सुतार यांनी याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जावा अशी मागणीही त्यांनी केली.
राज्य सरकारच्या घोषणेवर नोएडामधील आपल्या स्टुडिओमध्ये माध्यमांशी बोलताना सुतार यांनी पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करताना राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले की हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नाही तर हिंदुस्तान भूषण पुरस्कार आहे. देशभरात अनेक पुतळे बनविले, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील साकारला आहे.
शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारला जावा तसेच येथील शिवपुतळा बनविण्याची संधी मिळाली तर आनंदच वाटेल. दरम्यान, राम सुतार यांचे शिल्पकार पुत्र अनिल सुतार यांनीही महाराष्ट्रभूषण पुरस्काराबद्दल आनंदाची भावना व्यक्त केली. ‘‘वडिलांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली असताना त्यांना हा पुरस्कार मिळतो आहे.
त्यांच्या कर्तृत्वाची राज्य सरकारने दखल घेऊन पुरस्कार दिला त्याबद्दल विशेष आभार,’’ असे अनिल सुतार म्हणाले. मालवण येथे उभारल्या जाणाऱ्या शिवपुतळ्याचे काम सुरू असून १५ एप्रिलपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होईल अशी टिपणीही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.