CM Devendra Fadnavis : पंडित नेहरु यांचाही निषेध करणार का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

विरोधकांनी प्रशांत कोरटकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केल्याने फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.
CM Devvendra Fadnavis
CM Devvendra Fadnavissakal
Updated on

मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावरील कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडीने बुधवारी विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे प्रशांत कोरटकर व अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर सरकारने कारवाई करण्यासाठी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरत ठिय्या आंदोलन केले. याविषयी सभागृहात चर्चा घेण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्यानंतर विरोधकांनी कामकाजात सहभाग घेतला.

विरोधकांनी प्रशांत कोरटकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केल्याने फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली ते म्हणाले, ‘कोरटकर तर चिल्लर आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही.

पण, पंडित जवाहरलाल नेहरुंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे, त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का,’ असा सवाल करत विरोधकांवर उलटवार केला. त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांच्या गदारोळात सभापतींनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत कोरटकर व सोलापूरकर यांच्या अटकेसाठी सभागृहात जोरदार घोषणाबाजी, ठिय्या आंदोलन करत कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. सभागृहाचे कामकाज सुरु होताच काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कामकाजाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला.

ते म्हणाले, ‘औरंगजेबाच्या उदात्तीकरणप्रकरणी अबू आझमींचा आम्ही निषेध केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी असे, आपण सगळ्यांनी मिळून ठरविले. पण त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे कोरटकर आणि सोलापूरकर मोकाट कसे,’? असा सवाल त्यांनी केला.

शिवरायांचा वेगवेगळ्या ठिकाणी अवमान झाला आहे, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी २८९ चा प्रस्ताव दिला आहे. सभागृहाचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंगळवारी आम्ही संपूर्ण भाषण ऐकले आहे. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. अबू आझमींवर कारवाई करायची असेल तर ते करू शकले असते, मग त्यांनी आझमींना तुरुंगामध्ये का टाकले नाही, असा संतप्त सवाल करत सरकारने कोरटकर व सोलापूरकर यांच्याविषयीही बोलले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली.

सभापतींनी २८९ चा प्रस्तावावरील चर्चा फेटाळल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी सोलापूरकर, कोरटकरला अटक करा, या मागणीचे पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत हौद्यामध्ये ठिय्या दिला. सत्ताधारी व विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभापतींनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

कोरटकर व सोलापूरकर यांच्या अटकेसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधकांवर फडणवीस यांनी उलटवार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना आम्ही नक्कीच तुरुंगात टाकू. पण कोरटकरने कोल्हापूरच्या न्यायालयातून अटकेवर स्थगिती घेतली आहे. त्यावर वरील न्यायालयात जाणार आहोत.

पंडित नेहरुंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का, तुमच्यात हिंमत आहे का, असा सवाल करत नेहरुंचाही धिक्कार झाला पाहिजे. छत्रपतींच्या विरुद्ध सर्वांत जास्त नेहरुंनी लिहिले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

निवडक वागू नका!

कोरटकरसारखे लोक तर चिल्लर आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड काय बोलले, औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब बलाढ्य होता, महाराज पाच फुटांचे होते, हे त्यांचे वक्तव्य रेकॉर्डवर आहे. त्याचा निषेध का होत नाही, असा सवाल करत असे निवडक वागू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com