"बंडोबां'चा दोन दिवसांत "थंडोबा' करू - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 5 October 2019

लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड कौल देऊन केंद्रात एनडीएचे सरकार आले. त्याचप्रमाणे राज्यातही विक्रमी जागा जिंकून महायुतीचे सरकार येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्‍त केला.

मुंबई -  ""एखाद्या विषयावरील राजकीय मते वेगळी असू शकतात. मात्र भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांतील हिंदुत्वाचा धागा समान आहे. त्यामुळे लोकसभेला युतीची घोषणा झाली. ती विधानसभेला होईल का, असा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड कौल देऊन केंद्रात एनडीएचे सरकार आले. त्याचप्रमाणे राज्यातही विक्रमी जागा जिंकून महायुतीचे सरकार येईल,'' असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्‍त केला. "बंडोबां'चा दोन दिवसांत "थंडोबा' करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्रालयाजवळील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात झालेल्या महायुतीच्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीची औपचारिक घोषणा केली. भाजप 150, शिवसेना 124 आणि मित्रपक्ष 14 असे जागावाटप झाल्याचे स्पष्ट झाले. 

फडणवीस म्हणाले, ""भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, याबाबत प्रश्‍न विचारला जात होता. शंका व्यक्‍त केली जात होती. मात्र आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही निश्‍चित होतो. जागावाटपात आम्हाला काही ठिकाणी तडजोड करावी लागली. ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मनातील महायुती आहे. या महायुतीला प्रचंड यश मिळणार आहे.'' 

या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणे, हे शिवसैनिकांचे स्वप्न आहे, असे सांगितले. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, की युतीत लहान भाऊ, मोठा भाऊ असे काही नसते. महायुती एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊन सत्ता संपादन करणार आहे. यानंतर न भांडता सत्तेमध्ये सहभागी होणार आहे आणि महाराष्ट्र घडवणार आहे. 

आदित्यचे पहिले पाउल 
""राजकारणात सक्रिय होणे म्हणजे काय? आम्ही सगळे राजकारणात सक्रिय झालो आहोत. निवडणुकीत थेट उतरणे हे आदित्यचे पहिले पाउल आहे. याबाबत त्यालाच विचारा. मात्र तो महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न घेऊन उतरला आहे,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे थोडे उशिरा पोचले. आदित्य यांच्या नावाचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी असे भाकीत करतो की मुंबईत आदित्य ठाकरे हे विक्रमी मतांनी निवडून येणार आहेत. 

युतीचा जाहीरनामा लवकरच 
भाजप-शिवसेनेचे वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित होतीलच मात्र, महायुतीचा संयुक्‍त जाहीरनाता लवकरच प्रसिद्ध केला जाईल. यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न असेल. पुढील पाच वर्षांत दुष्काळमुक्‍त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले. 

बंडोबांचा बंदोबस्त करणार 
""शिवसेना-भाजपने एकादिलाने काम करायचे ठरवले आहे. तरीही दोन्ही बाजूने अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी झालेली असेल, तर याबाबत पुढील दोन दिवसांत त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना योग्य समज दिली जाईल. त्यातून नाही ऐकले, तर दोन्ही पक्षांतील बंडखोरावर योग्य ती करावाई करण्यात येईल,'' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तावडे, खडसे यांना दुसरी जबाबदारी 
भाजपने ज्यांना उमेदवारी नाकारली आहे, त्या विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित आदींना पक्ष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देणार असल्याचे सूतोवाच या वेळी मुख्यमंत्र्यांनी केले; तसेच आयारामांपेक्षाही पक्षातील निष्टावंतांनाच उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले. 

घटक पक्षांचे नेते अनुपस्थित 
भाजपचे घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं रामदास आठवले गट, रयत क्रांती सेना, शिवसंग्राम या पक्षांचे नेते उमेदवारी अर्ज भरण्यात गुंतले असल्यामुळे ते या पत्रकार परिषदेला उपस्थित नाहीत, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. 

घटक पक्ष "कमळा'च्या चिन्हावरच 
भाजपने घटक पक्षांना 14 जागा सोडल्या आहेत, असे जाहीर करून मुख्यमंत्री म्हणाले की या 14 जागांपैकी 12 ठिकाणी "कमळा'च्या चिन्हावर घटक पक्षांचे उमेदवार लढत असून इतर दोन ठिकाणी घटक पक्षांचे उमेदवार अन्य चिन्हांवर लढत आहेत. 

शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणे हे शिवसैनिकांचे स्वप्न आहे. युतीत लहान भाऊ, मोठा भाऊ असे काही नसते. असे प्रश्‍न निर्माण करण्यापेक्षा नाते टिकले हे महत्त्वाचे आहे. 
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis warned rebel candidates in bjp and shivsena