Cabinet Expansion: ठाकरे गटाच्या 'त्या' वक्तव्यावर CM शिंदेंच उत्तर म्हणाले, शिंदे गटात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde & Team

Cabinet Expansion: ठाकरे गटाच्या 'त्या' वक्तव्यावर CM शिंदेंच उत्तर म्हणाले, शिंदे गटात...

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, गेल्या काही महिन्यापासून प्रतीक्षित असलेल्या शिंदे गट आणि भाजपच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आणि शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पडदा टाकला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याचे संकेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची यादीही तयार असल्याची माहिती त्यांनी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिली. त्याचबरोबर शिंदे गटातील कोणतेही आमदार जाराज नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या आणि काही आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे अनेक खात्यांचा पदभार आहे. तर काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे मंत्र्यांवरील भार कमी करून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण होईल. मंत्रिमंडळ खाते वाटपाचा फॉर्म्युला यापूर्वीच ठरला आहे. त्याचबरोबर मंत्र्यांच्या संख्येबाबतही यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा बाकी आहे. मंत्र्यांची यादी सुद्धा तयार आहे. अधिवेशनापूर्वी हा विस्तार करण्याचा सरकारचा विचार असल्याची संकेतही शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. आपल्या पक्षात कोणीही नाराज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.