मेट्रो कारशेड झाडे कापण्याच्या चौकशीसाठी समिती

टीम ई सकाळ
Wednesday, 11 December 2019

  • दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : कुलाबा- वांद्रे- सिप्झ मेट्रो मार्गाच्या कारशेडसाठी आरेतील झाडे कापण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या चौकशीसाठी अर्थ विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीला आपला अहवाल 15 दिवसांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी सद्यःस्थितीत निश्‍चित केलेल्या जागेऐवजी पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आणि वाजवी किमतीत पर्यायी जागा उपलब्ध आहे किंवा कसे? मेट्रो कारशेडसाठी आरेतील 2 हजार 100 झाडांची कापणी करण्यापूर्वी विहित पद्धतीचा अवलंब केला होता का? आरे कॉलनीतील जमिनीच्या पर्यावरण रक्षणासाठी काय उपाययोजना करणे आवश्‍यक आहे? याबाबत ही समिती चौकशी करेल.

CAB : आसाम पेटले; हजारो आंदोलक रस्त्यांवर

नगरविकास विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन आदेश जारी केला. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. कार्पोरेशनचा हा निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरला होता. निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, तरीही कारशेडसाठी कार्पोरेशनने एका रात्रीत आरेतील झाडांची कत्तल केली होती. पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध झुगारून झाडे कापण्यात आल्याने मोठा जनक्षोभ उसळला होता. शिवसेनेने या विरोधात आवाज उठवला होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिली होती. आता त्यांनी आरेतील वृक्ष कत्तलीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Committee for Inquiry to cut Metro Carshed Trees