वन संवर्धन करताना हौतात्म्य आल्यास काय म्हणाले वनमंत्री... वाचा 

राजेश रामपूरकर
Saturday, 12 September 2020

राज्यात अनेक वन अधिकारी व कर्मचारी यांनी वन्यजीव व वने यांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुति दिली आहे. वन्यजीव व वन संरक्षणासाठी वन अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले बलिदान हे नक्कीच प्रेरणादायी व स्फूर्तिदायक आहे. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ नागपूर येथे वन हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. त्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात वन हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार आहे. 

नागपूर :  वन विभागातील फ्रंटलाइन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वन्यजीव व वन संरक्षण करताना हौतात्म्य आल्यास सानुग्रह अनुदान देण्याबाबतची योजना लवकरच मंत्रिमंडळासमोर आणणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात वन हुतात्मा स्मारक उभारणार असल्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी संगितले 

राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. वनमंत्री म्हणाले, आपला समाज हा पूर्वीपासूनच निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो. जंगले वाढली तरच मानवाचा या धरतीवर टिकाव लागेल. जंगलांचे महत्व संत व महात्मे यांनी सुद्धा वर्णिले आहे. 11 सप्टेंबर 1738 रोजी, स्थानिक राजाने दिलेल्या वृक्षतोडीच्या अयोग्य आदेशाविरूद्ध, राजस्थान येथील बिष्णोई समाजाच्या 363 व्यक्तींनी आपले बलिदान दिले होते. राज्यात सुद्धा अनेक वन अधिकारी व कर्मचारी यांनी वन्यजीव व वने यांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुति दिली आहे. वन्यजीव व वन संरक्षणासाठी वन अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले बलिदान हे नक्कीच प्रेरणादायी व स्फूर्तिदायक आहे. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ नागपूर येथे वन हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. त्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात वन हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार आहे. 

भर रस्त्यात महिलेला आली भोवळ.. रस्त्यावरचे आयुष्य जगणारा आला धावून, रक्ताचे नाते मात्र दिसलेच नाहीत; वाचा काय घडले

वन्यजीव व वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करणे ही वन विभागाची प्राथमिकता आहे. वन्यजीव यांची शिकार आणि नैसर्गिक संसाधनांची तोड व चोरटी वाहतूक रोखण्यासाठी अनेक वनाधिकारी आणि वन कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे अनेकदा संरक्षण क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. यात अनेकांना प्राणास मुकावे लागते. अशी दुर्दैवी घटना घडल्याने अशा अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबास हलाखीचे जीवन जगावे लागते. म्हणून त्यांच्या कुटुंबियांसाठी सानुग्रह अनुदान देण्याची योजना लवकरच मंत्रिमंडळासमोर आणणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compensation Grant in Case of Martyr During Forest Conservation