esakal | Vidhan Sabha 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur-district-vidhan-sabha

राष्ट्रवादीमधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेले आउटगोइंग. सत्ता नसतानाही सत्तेत असल्याचा नेत्यांना होत असलेला भास. त्यातून एका-एका जागेसाठीची खेचाखेची, एकही जागा नसलेल्या काँग्रेसमध्ये आलेली मरगळ, हे सारे झटकून पुन्हा उभारी घेण्याच्या आव्हानांचा सामना करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाची लढाई आहे. 

Vidhan Sabha 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

sakal_logo
By
निवास चौगले

विधानसभा 
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा पुरेपूर फायदा जिल्ह्यात युतीकडून उठवला जातोय. जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भाजपने आपलेसे केले. विरोधकांना खिळखिळे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात याच पक्षांना निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार काही ठिकाणी मिळेनात. सत्ता जाऊनही अद्याप सत्तेत असल्याचा नेत्यांना होत असलेला भास, त्यातून लवचिक धोरण न स्वीकारण्याची मानसिकता, पक्षांतर्गत गटबाजीने दोन्हीही पक्ष ग्रासलेत. काँग्रेसचे जहाज भरकटल्यासारखेच आहे, नाही म्हणायला जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांच्या नियुक्तीनंतर पक्षात जान आली आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसने नऊ जागांवर उमेदवार दिले; पण त्यांना सपशेल अपयश आले. राष्ट्रवादीने दोन जागा जिंकत पक्षाची लाज राखली. आता दोन्ही पक्षांची आघाडी आहे आणि आघाडीत काँग्रेसला सात, तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्यात; मात्र काँग्रेसकडे चार ठिकाणी निवडून येतील, असे ताकदीचे उमेदवार नसल्याची स्थिती आहे. असे असताना शिरोळची जागा ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा तिढा सोडवण्यास विलंब होतोय. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला तगडा उमेदवार शोधावा लागतोय.
राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी लढण्यापूर्वीच माघार घेतली आहे. त्यांच्यावर पक्षाचा लढण्यासाठी दबाव असला, तरी युतीचा निर्णय होईपर्यंत त्यांचा निर्णय होणार नाही. राधानगरीत उमेदवारी कोणाला यावरून पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि त्यांचे मेव्हणे, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात ताणाताणी आहे. एकाला उमेदवारी दिली तर दुसरा थांबणार का? या प्रश्‍नाचे उत्तर पक्षनेतृत्वाकडेही नाही. डावललेला इच्छुक दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेण्याच्या भीतीमुळे निर्णय लांबत असेलही; पण त्यावर तोडगा कधी निघणार हाच प्रश्‍न आहे.

मोजता येईनात गटतट
एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीची अशी अवस्था असताना शिवसेना-भाजप युतीमध्येही अलबेल आहे, असे नाही. शहर शिवसेनेत मोजता येईनात एवढे गट आहेत, भाजपने कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेच्या उमेदवारालाच विरोध चालवलाय. किंबहुना ही जागा भाजपला घेऊन तेथून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उभे राहावे, अशी चर्चा सुरू आहे. शिरोळमध्ये ज्या बहुजन आघाडीने आमदार उल्हास पाटील यांना विजयी केले, ती आघाडीच आज त्यांच्याविरोधात आहे. कागलची जागा कोणाला यावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच आहे. चंदगडमध्ये शिवसेनेत इच्छुकांची मांदियाळी आहे. ‘जनसुराज्य’ला किती जागा सोडायच्या आणि काय निर्णय घ्यायचा याविषयी गोंधळाचे वातावरण आहे; मात्र त्याचा लाभ काँग्रेस, राष्ट्रवादीला उठवता येत नसल्याचे चित्र आहे.

‘वंचित’ धोका वेगळाच
काँग्रेस, राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीचाही धोका आहे. सर्व मतदारसंघात त्यांचे उमेदवार असतील. आपल्याकडील एखादा सक्षम उमेदवार त्यांच्या हाताला लागू नये यासाठीही त्यांचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांसारखे दोन्ही काँग्रेसच्या मतावर परिणाम करणारे उमेदवार तिकडे चालले आहेत.
हे मुद्दे महत्त्वाचे
    गोकूळ मल्टिस्टेटचा प्रश्‍न
    महापुराचा फटका, त्यानंतरचे मदतकार्य
    शेतकरी कर्जमाफी, पीकविम्याचा पेच
    उद्योगांचा विकास, बेरोजगारीचे प्रश्‍न