काँग्रेसला महाराष्ट्रात हवा नवा भिडू; 'राष्ट्रवादी' नको, 'वंचित' हवे!

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 8 जून 2019

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, असा सूर आज कॉंग्रेसच्या बैठकीमध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आळवला.

मुंबई - लोकसभेच्या रणांगणात पानिपत झाल्यानंतर राज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाने नवा भिडू शोधायला सुरवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, असा सूर आज कॉंग्रेसच्या बैठकीमध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आळवला. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केली तरीसुद्धा याचा पक्षाला काहीच फायदा होत नाही, अशी तक्रारही या वेळी करण्यात आली. 

राज्यामध्ये "वंचित बहुजन'सोबत आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस नेतृत्वाने प्रयत्न करावेत, यासाठी पक्ष नेतृत्वाने बोलणी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज टिळक भवन येथे झालेल्या आढावा बैठकीला राज्यभरातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत कॉंग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल नाराजीचा सूर आळवला. ज्या ठिकाणी कॉंग्रेसचा पराभव झाला तिथे जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिल्याची माहितीही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची अनेक मतदारसंघांत अपेक्षित मदत मिळाली नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. "राष्ट्रवादी'ऐवजी "वंचित आघाडी'शी हातमिळवणी केल्यास कॉंग्रेसला जास्त फायदा होईल, असे अनेक नेत्यांचे म्हणणे होते. महाराष्ट्रात कॉंग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यात कॉंग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला. अशा परिस्थितीत कॉंग्रेसला भरवशाच्या आणि मतांची बिदागी मिळवून देणाऱ्या साथीदाराची साथ हवी आहे. असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्‍त केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत "वंचित बहुजन आघाडी'च्या उमेदवारांनी विविध ठिकाणांवर 41 लाख मते खेचल्यामुळे आघाडीच्या नऊ उमेदवारांचा पराभव झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress need Vanchit Bahujan Aghadi party in Maharashtra