मोदी-शहांच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडिओची चौकशी; गृहमंत्र्यांची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क 
Wednesday, 22 January 2020

‘तानाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या चित्रफितीवर मोदी आणि अमित शहा यांचे चेहरे लावून तयार करण्यात आलेल्या वादग्रस्त व्हिडिओची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. 

मुंबई, ता. 21 : "तानाजी' चित्रपटाच्या ट्रेलरच्या चित्रफितीवर मोदी आणि अमित शहा यांचे चेहरे लावून तयार करण्यात आलेल्या वादग्रस्त व्हिडिओची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, तर तानाजी मालुसरे यांच्या जागी अमित शहा यांचा चेहरा लावून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओचा जाहिरात म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांची अशा प्रकारे विटंबना केली जात असल्याचा संताप महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये उसळला होता. 

सोशल मीडियामध्ये याबाबतचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोरदार असंतोष निर्माण झाला होता. याचसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हा व्हिडिओ काढून घेण्याची मागणी करणारी तक्रार दाखल झाली होती. त्याचा आधार घेत देशमुख यांनी या संपूर्ण व्हिडिओची चौकशी करून ट्विटर आणि इतर सोशल मीडियातून हा व्हिडिओ काढण्याचे आदेश संबंधितांना देणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, ज्या कोणी हा व्हिडिओ बनवला त्यांची सखोल चौकशी करणार असल्याचेही देशमुख यांनी जाहीर केले. दरम्यान, हा वादग्रस्त व्हिडिओ यू-ट्यूबवरून काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्याचे समजते.

भाजपने भूमिका स्पष्ट करावी : संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी नरेंद्र मोदी यांना दाखविलेल्या व्हिडिओबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या व्हिडिओचा वापर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये केला जात आहे. संजय राऊत म्हणाले की, चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही लोकांनी हंगामा केला होता. त्या सर्वांना मी ते फोटो पाठविले आहेत. आता मी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे. काही लोकांनी सातारा, सांगली बंद केले. छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. आमचे ते दैवत आहेत. आमचा जीव गेला तरी चालेल; मात्र छत्रपतींचा अपमान आम्हाला चालणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversial video Tanaji movie