स्वाइन फ्ल्यूच्या 11 वर्षातील रुग्णसंख्येच्या पाचपट कोरोना संसर्ग अवघ्या वीस दिवसांत 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

राज्यात 1 ते 20 जुलै या 20 दिवसांमध्ये एक लाख 43 हजार 934 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले. स्वाइन फ्ल्यूच्या 11 वर्षांतील फैलावाच्या तुलनेत कोरोनाचा उद्रेक पाचपट अधिक असल्याचे यातून स्पष्ट होते. 

पुणे - राज्यात गेल्या 11 वर्षांमध्ये स्वाइन फ्ल्यूचे जेवढे रुग्ण आढळले, त्याच्या पाचपट कोरोना संसर्गाच्या रुग्णांचे निदान 20 दिवसांमध्ये झाले. नेमके औषध नाही, प्रतिबंधक लशीचा अभाव आणि वेगाने पसरणारा संसर्ग यामुळे स्वाइन फ्ल्यूपेक्षा कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वेगाने वाढली. 

राज्यात 2009 मध्ये स्वाइन फ्ल्यूचा उद्रेक झाला होता. देशातील स्वाइन फ्ल्यूचा पहिला मृत्यू पुण्यात ऑगस्टमध्ये झाला. त्यानंतर स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढत गेली. 11 वर्षांनंतर आता कोरोना विषाणूंचा उद्रेक राज्यात झाला. स्वाइन फ्ल्यूच्या "एच1-एन1' विषाणूंपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा नवीन "कोविड-19' विषाणूंमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. 

स्वाइन फ्ल्यू आणि कोरोना उद्रेक 
राज्यात 2009 या एका वर्षात स्वाइन फ्ल्यूच्या पाच हजार 278 रुग्णांची नोंद झाली होती. या आजाराच्या सर्वाधिक म्हणजे आठ हजार 583 रुग्णांची नोंद 2015 मध्ये झाली. गेल्या 11 वर्षांमध्ये स्वाइन फ्ल्यूचे 27 हजार 675 रुग्ण आढळले आहेत. राज्यात 1 ते 20 जुलै या 20 दिवसांमध्ये एक लाख 43 हजार 934 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले. स्वाइन फ्ल्यूच्या 11 वर्षांतील फैलावाच्या तुलनेत कोरोनाचा उद्रेक पाचपट अधिक असल्याचे यातून स्पष्ट होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्वाइन फ्ल्यूच्या तुलनेत प्रचंड वेगाने सध्या कोरोना पसरत आहेत. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्चला पुण्यात आढळल्यानंतर अवघ्या चार महिन्यांमध्ये रुग्ण संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली. 

स्वाइन फ्लू आणि कोरोना विषाणूंचे साधर्म्य 
- संसर्ग तोंडातून उडणाऱ्या थुंकीतून, शिंकण्या, खोकण्यातून होतो 
- ताप, सर्दी, खोकला ही समान लक्षणे 
- न्यूमोनिया 

दोन्हीतील फरक 
- स्वाइन फ्ल्यूच्या तुलनेत कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे स्वाइन फ्ल्यूपेक्षा हा वेगाने पसरल्याचे दिसते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ठळक मुद्दे 
- स्वाइन फ्ल्यूच्या वेळी टॅमिफ्ल्यू औषध आपल्या हातात होते. 
- अवघ्या सात ते आठ महिन्यांमध्ये स्वाइन फ्ल्यूची प्राथमिक लस उपलब्ध. 
- लशीमुळे डॉक्‍टर, परिचारिका यांना स्वाइन फ्ल्यूच्या संसर्गापासून संरक्षण मिळाले. 

वाढलेल्या प्रयोगशाळा तपासणी 
राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या निदानासाठी अद्यापही 42 प्रयोगशाळा आहेत. मात्र, कोरोना निदानाच्या 280 प्रयोगशाळा सक्रिय आहेत. त्यातून दररोज तपासल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 

विषाणू का पसरतात? 
स्वाइन फ्ल्यू आणि आता कोरोना यासारखे विषाणूजन्य साथीचे आजार वेगाने पसरतात. कारण, या विषाणूंचा प्रतिकार करण्याची क्षमता कोणामध्येच नसते. त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला हा आजार होण्याचा धोका असतो. 

स्वाइन फ्ल्यू निदानासाठी असलेल्या प्रयोगशाळांपेक्षा सहा पट जास्त प्रयोगशाळा राज्यात कोरोनासाठी आहेत. स्वाइन फ्ल्यूच्या काळात राज्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी करण्याच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्याही वाढल्याचे दिसते. राज्यातील 16 लाख रुग्णांची तपासणी गेल्या चार महिन्यांमध्ये केली आहे. 
- डॉ. प्रदीप आवटे, 
साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is currently spreading at a tremendous rate compared to swine flu