
सोलापूर : मला काही होत नाही, कशाला मास्क वापरायचा, सारखा मास्क घातला की जीव गुदमरतोय... अशी कारणे सांगून गर्दीच्या ठिकाणी तुम्ही मास्क वापरायचे टाळत असाल तर सावध व्हा. तो माझ्या ओळखीचाच आहे, त्याच्यापासून कशाला लांब राहायचे? असे म्हणून सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडत असाल तर सावध व्हा. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत (30 जुलै) 449 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाची लागण झाली तर खासगी दवाखान्यात अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत अन् सरकारी दवाखान्यात उपचार घ्यायचे म्हटले तर परत येण्याची शाश्वती कमीच आहे. कोरोना तुमचा खिसा कापतोय आणि जीवही घेतोय, अशी विचित्र स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
आमच्याकडे बेडच शिल्लक नाहीत... हे खासगी हॉस्पिटलचे पहिलेच वाक्य ऐकून कोरोनाबाधितांना आणि त्यांच्या नातेवाइकांना पहिला झटका दिला जातो. काही तरी करा, हवे तर दोन पैसे जास्त घ्या, पण बेड उपलब्ध करून द्या... म्हणताच कोरोनाबाधिताच्या उपचाराची सुरवात ट्रॉलीपासून होते. कोरोनाबाधिताला जर मधुमेह, रक्तदाब यासह इतर कोणतेच आजार नसतील तर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी सरासरी दीड ते दोन लाख रुपये मोजावे लागतात. वयस्कर व्यक्ती, इतर आजारांची व्यक्ती असेल तर हाच आकडा पाच ते सात लाखांच्या घरात जातो. उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा कितीही गाजावाजा होत असला तरीही खासगी रुग्णालये त्यातून पळवाट काढतात आणि रुग्णाच्या माथी लाखोंचे बिल मारतात. साडेआठ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील फक्त 600 जणांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळाला आहे. रुग्णावर दहा ते पंधरा दिवस उपचार करायचे, त्याच्याकडून पैसे उकळायचे बंद झाले की तुम्ही पेशंटला पुण्याला आणि मुंबईला घेऊन जा... अशी भाषा वापरायची पद्धत सोलापुरातील काही रुग्णालयांत सुरू झाली आहे. कोरोना झाल्यावर चांगल्या उपचारासाठी व रुग्णालयाचे बिल कमी करण्यासाठी ओळख आणि वशिला गाठण्यापेक्षा कोरोना होऊ नये म्हणून आवश्यक असलेली खबरदारीच घेणे अधिक सोपे व शक्य आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून 30 जुलैअखेर 449 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 363 तर जिल्हा परिषद हद्दीतील 86 जणांचा समावेश आहे. गरिबांचे हक्काचे हॉस्पिटल असलेल्या सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार (सिव्हिल) रुग्णालयात सर्वाधिक 198 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात 65, सोलापुरातील यशोधरा रुग्णालय व अश्विनी सहकारी रुग्णालयात प्रत्येकी 45 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात रुग्णालयनिहाय मृत पावलेल्या कोरोनाबाधितांची संख्या : कंसातील संख्या ग्रामीण व महापालिका हद्दीतील मृत पावलेल्या व्यक्तींची.
कोरोना चाचणीसाठी पुढाकार घ्या
सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे दिसली तर अंगावर काढू नका. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कोरोनाबाधित रुग्ण जेवढ्या लवकर उपचार घ्यायला सुरू करतात तेवढ्या लवकर तो रुग्ण बरा होण्याची अधिक शक्यता असते. महापालिका हद्दीतील नागरिकांनी कोरोना चाचणीसाठी पुढाकार घ्यावा. कोरोनामुक्तीसाठी सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडा
महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुणे या माध्यमातूनच आपण कोरोनाला हरवू शकतो. या तिन्ही सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास तुम्ही निश्चित सुरक्षित राहाल. कोरोना झाल्यावर उपाय आणि उपचार करण्यापेक्षा नागरिकांनी कोरोना होऊ नये म्हणूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना स्वीकारणे कधीही चांगले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सांगितले.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवा
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीवर तुम्ही 90 टक्के सुरक्षित राहू शकता. कोरोना चाचणीसाठी आपल्या भागात येणाऱ्या महापालिकेच्या पथकाला त्या भागातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यावर सोलापूर शहर कमीत कमी कालावधीत कोरोनामुक्त करता येईल. पुरेशी झोप, सकस आहार, व्यायाम, योगा आणि प्राणायामच्या माध्यमातूनही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
हॉस्पिटलच्या खर्चात झाली वाढ
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ज्या बाबी शासनाने निश्चित केल्या आहेत, त्याशिवाय इतर उपचार केल्यास त्याचा वाढीव खर्च रुग्णांकडून / नातेवाइकांकडून घेतला जातो. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून आतापर्यंत केलेल्या उपचाराची रक्कम अद्यापही शासनाने रुग्णालयांना दिलेली नाही. कोरोनामुळे हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या खर्चातही वाढ झाली आहे. या सर्वांचा परिणाम काही ठिकाणी वाढीव बिले येण्याची शक्यता असल्याची माहिती सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसएिशनचे माजी अध्यक्ष डॉ. सुदीप सारडा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.