esakal | कोरोनामुक्तांनी प्लाझ्मा दान करावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

कोरोनावर प्रभावी औषधोपचार नाहीत. लक्षणांनुसार विशेष औषधे दिली जात आहेत. लस टोचल्यास रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून रुग्णाला तयार अँटीबॉडी दिल्या जातात. 

कोरोनामुक्तांनी प्लाझ्मा दान करावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी राज्यभर प्लाझ्मा थेरपीचा वापर होतो आहे. महाराष्ट्रात जगातील सर्वांत मोठी प्लाझ्मा थेरपीची चाचणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींनी अन्य रुग्णांवरील उपचारांसाठी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यातील 23 वैद्यकीय महाविद्यालयांत प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्लाटिना प्रोजेक्‍ट प्लाझ्मा थेरपी चाचणी केंद्रासह प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इमर्जन्सी ऑथरायझेशन या सुविधांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. जगातील ही सर्वांत मोठी सुविधा आपण राज्यात सुरू करत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग झाला होता. नंतर केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शेवटपर्यंत थांबू नका
आज कोरोनावर प्रभावी औषधोपचार नाहीत. लक्षणांनुसार विशेष औषधे दिली जात आहेत. लस टोचल्यास रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून रुग्णाला तयार अँटीबॉडी दिल्या जातात. रक्ताचा तुटवडा झाल्यानंतर आवाहन करताच रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. आता कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींनी रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देण्यासाठी पुढे आले पाहिजे. वेळेत प्लाझ्मा दिल्यामुळे 10 पैकी नऊ रुग्ण बरे होतात. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याऐवजी आधीच तो देता येईल का यावर विचार व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य विभागातर्फे यंत्रसामग्री
राज्यातील 23 वैद्यकीय महाविद्यालयांत प्लाझ्मा उपचार केले जातात. जगात कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली जाते. सौम्य व गंभीर रुग्णांवर असे उपचार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या 10 ठिकाणी आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी यंत्र पुरवले जाणार आहे. संकलित केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयांना दिला जाईल. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्वी होण्याचा दर 90 टक्के आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचे अन्य रुग्णांना प्लाझ्मा देण्याबाबत समुपदेशन करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

28 दिवसांच्या आत
कोविड केअर सेंटरमधून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांनी 10 दिवसांनंतर आणि 28 दिवसांच्या आत प्लाझ्मा दान केला पाहिजे. रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील अँटिबॉडी रुग्णाला दिली जातात. या अँटिबॉडी आधी कोरोनाशी लढलेल्या असतात. प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा, हे डॉक्‍टर ठरवतात. मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषधोपचारांनी बरा न होणारा, ऑक्‍सिजनची गरज असणारा रुग्ण यासाठी निवडला जातो. एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in येथे नोंद करून प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येऊ शकतो.