केवळ ४०० ते ४५० रुपयांत कोरोना तपासणी;  ‘अँन्टी जेन’ चाचणीला ‘आयसीएमआर’ची परवानगी 

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क 
Wednesday, 24 June 2020

महाराष्ट्र सरकारने ही ‘अँटी जेन’ चाचणी सुरू करण्यासाठी प्रचंड मोठ्या स्तरावर किट्‌स मागवल्या आहेत. ‘आयसीएमआर’ने यासंबंधी परवानगी दिली असून, विभागीय आयुक्त स्तरावर निविदा काढण्यात येणार आहेत.

मुंबई -  कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येण्याची शक्‍यता दृष्टिपथात नसतानाच या विचित्र रोगाची चाचणी केवळ ४०० ते ४५० रुपयांत करता येणार आहे. २२०० ते २५०० रुपये खर्च करणे परवडत नसलेल्या नागरिकांना हा मोठा दिलासा असून, महाराष्ट्र सरकारने ही ‘अँटी जेन’ चाचणी सुरू करण्यासाठी प्रचंड मोठ्या स्तरावर किट्‌स मागवल्या आहेत. ‘आयसीएमआर’ने यासंबंधी परवानगी दिली असून, विभागीय आयुक्त स्तरावर निविदा काढण्यात येणार आहेत. 

नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ) अंतर्गत या चाचणीचा खर्च उचलला जाणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाशी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली आहे. महाराष्ट्राची गरज लक्षात घेता ही चाचणी ४०० ते ४५० रुपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

ज्या वस्तीत संसर्ग झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत, तेथे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा चाचण्या करणे उपयोगाचे ठरणार आहे. राज्यात या चाचण्या कुठे सुरू करता येतील, किंबहुना कोरोना आढळणाऱ्या बहुतांश ठिकाणी या चाचण्या कशा सुरू करता येतील, याचा आराखडा आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास आणि वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्याशी चर्चा करून निश्‍चित केला जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

‘अँटी बॉडीज’ची चाचणी 
‘अँटी जेन’ या चाचणी अंतर्गत संशयित व्यक्तीची लाळ तपासून ३० ते ३५ मिनिटांत कोरोना आहे किंवा नाही, याचे निदान केले जाते. वैद्यकीय क्षेत्रात या चाचणीचे निकाल ४५ ते ८० टक्के खरे निघतात, असे जागतिक आकडेवारीचा आधार घेत नमूद करण्यात आले आहे. अचूकतेची ६५ टक्के सरासरीही वाईट नसून, एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली तर लगेचच विलगीकरण आणि उपाययोजना करणे सोपे होणार आहे. रक्ताचे नमुने घेऊन अँटी बॉडिजची चाचणीही सुरू केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test for only Rs. 400 to 450; ICMR permission for anti-gene testing