esakal | Corona Update: सुखद! राज्यात आज बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

बोलून बातमी शोधा

esakal

देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून 50 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

Corona Update: सुखद! राज्यात आज बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून 50 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी राज्यात 63 हजारांच्यापुढे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यात आज थोडी घट पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 51 हजार 751 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे सोमवारी कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 52,312 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सोमवारी 258 जणांना कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 58 हजार 245 रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 34 लाख 58 हजार 996 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 28 लाख 34 हजार 473 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे  5 लाख 64 हजार 746 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी भारताने एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आला आहे. जगातील सहापैकी एक रुग्ण भारतात आढळून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ९०४ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 झाली आहे. देशात सध्या कोरोनाचे १२ लाख १ हजार ००७ सक्रिय रुग्ण आहेत. १ कोटी २१ लाख ५६ हजार ५२९ लोकांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत १ लाख ७० हजार १७९ लोकांचा बळी घेतला आहे.