आठ जिल्ह्यांमध्ये साठवणार कोरोनावरील लस ! 'या' जिल्ह्यांना मिळणार वॉकिंग कुलर अन्‌ फ्रिजर 

तात्या लांडगे
Saturday, 28 November 2020


लस साठविण्यासाठी आठ जिल्ह्यांना मिळणार यंत्र सामुग्री 
लस साठविण्यासाठी आठ जिल्ह्यांना वॉकिंग कुलर व वॉकिंग फ्रिजर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. लस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप काहीच निर्देश प्राप्त झाले नसून लस प्राप्त झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यांमध्ये त्याचा साठा करुन वितरण होईल. 
- दिलीप पाटील, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य, पुणे 

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लस आता अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर लस साठा करण्यासाठी आठ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. लस अंतिम टप्प्यात आल्याने नाशिक, अकोला, नागपूर, औरंगाबाद, लातूर, मुंबई, ठाणे व पुणे या जिल्ह्यांमध्ये लस साठवून तिथून वितरीत केली जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने या जिल्ह्यांसाठी वॉकिंग कुलर व वॉकिंग फ्रिजर देण्याचा निर्णय घेतला आहे.

लस साठविण्यासाठी आठ जिल्ह्यांना मिळणार यंत्र सामुग्री 
लस साठविण्यासाठी आठ जिल्ह्यांना वॉकिंग कुलर व वॉकिंग फ्रिजर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. लस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप काहीच निर्देश प्राप्त झाले नसून लस प्राप्त झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यांमध्ये त्याचा साठा करुन वितरण होईल. 
- दिलीप पाटील, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य, पुणे 

देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असून मृतांची संख्याही लक्षणीय राहिली आहे. आता कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर, जानेवारीअखेर व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागाने वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सर्वच स्थानिक प्रशासनास त्यांच्या जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश काढले आहेत. साधारणपणे आताच्या रुग्णसंख्येत दुसऱ्या लाटेत किमान 10 टक्‍क्‍यांची वाढ होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार उपलब्ध आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे राबवायची, यासंबंधीचे नियोजन आता युध्दपातळीवर सुरु झाले आहे. डॉ. पाटील यांनी आज आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांना सर्वप्रथम लस दिली जाण्याची शक्‍यता असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात एक कोटींपर्यंत डोस लागतील. लस देण्यासंदर्भात आरोग्य विभागातील डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असेही सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लस वितरीत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील 41 जणांना दुसऱ्यांदा कोरोना 
कोरोनावर मात केल्यानंतरही राज्यातील 41 रुग्णांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे ऍन्टीबॉडी तयार झाल्याने बिनधास्तपणे फिरणाऱ्यांनीही नियमांचे तंतोतंत पालन करायलाच हवे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे. मास्कसह अन्य नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccine to be stored in eight districts! The districts will get walking coolers and freezers