राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला

Coronavirus-Increase
Coronavirus-Increase

दिवसभरात बारा जणांना बाधा; चाचणीचे निकष बदलले
मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून, राज्यभरात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले अाहेत. यामुळे बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये आठ रुग्ण मुंबई येथील, तर दोन जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी एक रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून, संसर्गाच्या सामूहिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. 

मुंबईत आढळलेल्या आठ रुग्णांपैकी सहा जणांची परदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे, तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एका रुग्णाने गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा, पण मुंबईतील रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील कोरोनाबाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतःही बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे.

दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. हा रुग्ण बाधित होण्यामागची कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

ही मंडळी देखरेखीखाली
राज्यात परदेशातून आलेल्या एकूण २७५ प्रवाशांना सर्वेक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

दहावीचा पेपरही पुढे ढकलला
राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे; तशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केली. हा पेपर कधी घ्यायचा ते ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com