डंख कोरोनाचा : तेरा वर्षाच्या लेकीला गमावलेला बाप आजही रडतोय ढसाढसा 

corona
corona

सोलापूर : पप्पा आता माझ्या पोटात दुखायच राहिलं...मला घरी घेऊन चला ना, असा हट्ट बापाकडे लावणाऱ्या 13 वर्षाची निकिताची भाषा अचानक बदलली. खासगी दवाखान्यात पोटदुखीच्या आजारसोबत दोन हात करणारी ती आता जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात आली होती. पप्पा मला कोरोना झालाय म्हणतात, आता तुम्ही कोणीच माझ्यासोबत नसणार का? पोरगी असं म्हणाली अन्‌ काही तासातच देवाघरी गेली.

स्कॅन करायचा, एक्‍स-रे काढायचा म्हणून पोरीला डॉक्‍टरनं काही खाऊ दिलं नाही. आम्हाला सोडून जाताना तिच्या पोटात फक्त पाणी अन्‌ सलाईनच होतं. 13 वरसाची माझी कवळी पोर तडफडून तडफडून आमच्यासमोर मेली. तिला कोरोना बिरोना काही नव्हता ओ, कोरोना झाल्याचे तिला कळले, त्याचीच तिने हबक्‌ खाल्ली अन्‌ ती आम्हाला सोडून गेली. आता तिची कसली तक्रार करू अन्‌ कोणाकडे करू असं म्हणत स्वतः:च्या दुखाला कवटाळत एक तरणाताठा बाप आजही ढसाढसा रडत आहे. 
ज्या वयात पोरीचं कोड कौतुक पहायचे त्याच वयात ती आम्हाला सोडून गेली. आज पंधरा दिवस झाले तरीही क्षणाक्षणाला निकिता सर्वांच्या डोळ्यासमोरून जात नाही.

कोरोनाने डंख मारलेली ही हृदयद्रावक घटना आहे निकिता नागनाथ सुरवसे या 13 वर्षाच्या मुलीची अन्‌ चाळिशीच्या आतील नागनाथ सुरवसे या बापाची. पोटात दुखतंय, काही दिवसांपूर्वी ताप येऊन गेला, उलट्याही झाल्या म्हणून निकिताला घेऊन तिचे वडील सोलापुरातील खासगी रुग्णालयात आले. मोठ्या दवाखान्यात गेलो, सरकारी दवाखान्यात गेलो तर तिथूनच तिला कोरोनाची लागण होईल ही भीती तिच्या कुटुंबाला होती. शिवाय सरकारी दवाखान्यात गेला की जिवाचा काही भरवसा नाही म्हणून त्यांनी सुरुवातील निकितावर सोलापुरातील खासगी दवाखान्यात उपचार घ्यायला सुरवात केली. 

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील रामपूर सारख्या दुष्काळी पट्ट्यीाल सुरवसे कुटुंब. कसून खायला त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. पाण्याचा भरवसा नसल्याने पावसावर पिकलं तेच आपले अशीच अवस्था सुरवसे कुटुंबाची आहे. दोन एक शेतावर दोघे नवरा बायको आणि निकितासह पाच मुली असल्याने सुरवसे यांचा संसार हा आर्थिक कसरतीचाच आहे. थोरली पोरं आजारी पडली म्हटल्यावर जवळ दोन पैसे असावेत म्हणून निकिताच्या बापाने तीन टक्के व्याजाने पैसे काढले. पोरीला 13 ऑगस्ट रोजी सोलापुरातील खासगी रुग्णालयात आणले. त्या खासगी रुग्णालयातील उपचाराचा फरक पडेना म्हणून त्यांनी तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलविण्याची तयारी केली.

कोरोनाच्या संकटात कोणीही सहजासहजी दवाखान्यात घेत नसल्याने त्यांनी त्या दवाखान्यात जाण्यासाठी ओळखही काढली. त्या खासगी दवाखान्यात नेण्यापूर्वीच डॉक्‍टर म्हणाले हिला सरकारी दवाखान्यात घेऊन जावा. महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री योजना यासह अनेक योजनांचा शासन मोठा गाजावाजा करत आहे. सुरवसे यांच्या सारख्या कुटुंबाला जर या योजना मिळत नसतील तर या योजनांचा लाभ मिळतोय कोणाला? त्यासाठी परिस्थिती पेक्षा वशिला लागतंय का? असाच सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

खासगी दवाखान्यात नियतीच्या विरोधात लढणाऱ्या निकिताचा आता सरकारी दवाखान्यातून संघर्ष सुरू झाला. ती दवाखान्यात आल्यावर काही तासातच गोंधळ सुरू झाला. ही पोरगी कोरोनाबाधित असल्याची वार्ता निकिताच्याही कानावर धडकली. 
पप्पा मला कोरोना झालाय म्हणतात, आता तुम्ही माझ्या जवळ थांबणार नाहीत ना? असं म्हणत 15 ऑगस्टला तिने देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनादिवशीच काही तासातच जगाचा निरोप घेतला. पाच मुलींचा पिता असलेल्या नागनाथ सुरवसे यांनी मोठ्या मुलीच्या दोन दिवसाच्या दवाखान्यासाठी 30-35 हजार रुपये मोजले. पैशासारखा पैसाही गेला आणि सोन्यासारखी पोरगीही गेली याचेच अधिक सर्वांना होत आहे. माझी पोरगी कोरोनाने गेली म्हणतात, मग मला आणि आशा वर्करचे काम करणाऱ्या माझ्या बायकोला, माझ्या बाकीच्या लेकरांना कोरोना का नाही झाला? या प्रश्‍नाने आजही नागनाथ सुरवसे यांच्या मनात काहूर माजविले आहे. माझी पोरगी कोरोनाने नाही ओ गेली असंच ते सर्वांना सांगत आहेत. गमावलेल्या निकिताच्या आठवणीत ते रोजचा दिवस काढत आहेत. 
(समाप्त) 

पाच वर्षाच्या ताहेरालाही बसला डंख 
सोलापूर शहर व जिल्ह्यातील 742 जणांचा बळी कोरोनाने आतापर्यंत घेतला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांमध्ये सर्वांत कमी वयातील व्यक्तीचा मृत्यू हा दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नवीन विडी घरकुलमधील आहे. अवघ्या पाच वर्षाच्या ताहेरा शेख हिला कोरोनाने डंख मारला आहे. पाच वर्षाच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू कसा होऊ शकतो? असा प्रश्‍न तिच्या परिवारासह सर्वांनाच पडला आहे. ताहेराला कोरोना झाल्याची प्रशासनाच्या दप्तरी नोंद झाली आहे. ताहेराच्या आई-वडिलांना मात्र कोरोना झाला नाही. शेख दांपत्यांना एकुलती एक असलेल्या ताहेराला तिच्या आई बापांनी कोरोनामध्ये गमावले आहे. ताहेरा नंतर सर्वांत कमी व्यक्तीच्या मृत्यू झालेल्यांच्या यादीत निकिताचे दुसरे नाव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com