Coronavirus: राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ३९ वर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

राज्यात आज दोन नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. 

मुंबई  - कोरोना विषाणूचा राज्यातील प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे अधिक सावधगिरीच्या उपाययोजना राबविण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. सर्वप्रकारचा सार्वजनिक संपर्क टाळण्याच्या सूचना सरकारने नागरिकांना दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात आज दोन नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात १०८ लोक विलगीकरण कक्षात दाखल असून, १०६२ ‘होम क्वारंटाइन’ असून, त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

यवतमाळ येथे कोरोनाबाधित आढळलेली ५१ वर्षांची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील ‘आयटी़’ तज्ज्ञाची आई आहे. ती स्वत-ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळलेल्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकूण १५ जण कोरोनाबाधित आढळले असून, २२ जण ‘निगेटिव्ह’ आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील तीन जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरातच वेगळे ठेवण्यात आले आहे. 

आज कोरोनाबाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता. तो फिलिपिन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत  फिलिपिन्सहून नवी मुंबईत आलेल्या या दहा जणांच्या चमूतील तीन जण कोरोनाबाधित आढळले असून,, इतर सात जण कोरोना ‘निगेटिव्ह’ आढळले आहेत. 

राज्यात आज ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर १६६३ विमानांमधील १ लाख ८९ हजार ८८८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. 

राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १९६३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत, तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.  

बाधित रुग्णांची संख्या
- पिंपरी-चिंचवड मनपा    ९
- पुणे मनपा    ७
- मुंबई     ६
- नागपूर    ४
- यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण    प्रत्येकी ३
- रायगड, ठाणे, नगर, औरंगाबाद    प्रत्येकी १
एकूण ३९

कोरोना व्हायरस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus in Maharashtra The number of patients state 39