मोठी बातमी ! अमोल जगतापसह कुटुंबाच्या गळफास प्रकरणी नगरसेवक लक्ष्मण जाधवला अटक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

दोघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी 
सिध्दाराम मलप्पा बिराजदार (रा. वारद चाळ, मुरारजी पेठ) आणि खंडू सुरेश सलगरकर (रा. सैफूल, कित्तुरचनम्मा नगर) या दोघांना न्यायालयासमोर हजर केले होते. त्यांना न्यायाधीश एस. व्ही. पवार यांनी 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठवली. तर दिनेशकुमार उर्फ बंडू दिलीप बिराजदार हा न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. देवमाने यांनी काम पाहीले, तर संशयित आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे व ऍड. विनोद सुर्यवंशी यांनी काम पाहीले.

सोलापूर : जुना पुना नाका परिसरात राहणाऱ्या अमोल जगतापने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून स्वत:सह पत्नी व दोन मुलांना गळफास देऊन ठार मारले. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरुन नगरसेवक लक्ष्मण जाधव याच्यासह अन्य तिघांनी अमोल जगतापला व्याजाने पैसे दिल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, नगरसेवक जाधव हा दुचाकीवरुन विजयपूरला निघाला. पोलिसांनी हात करुन न थांबता तसाच पळाला. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजित कुंभार व शैलेश खेडकर यांच्या पथकाने त्याला धुळखेड येथील शेतातून अटक केली.

अमोल जगताप याचे कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे गॅलेक्‍सी ऑर्केस्ट्रा बार होते. त्यासाठी अमोलने व्यंकटेश पंपण्णा डंबलदिनी याच्याकडून तीन टक्‍के व्याजदराने 70 लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात हॉटेलची जागा डंबलदिनी याने स्वत:च्या नावे करुन घेतली. दरमहा दोन लाख 10 हजारांचे व्याज घेतल्याचे पोलीस तपासांत समोर आले आहे. तर सिध्दाराम मलप्पा बिराजदार यानेही अमोलला व्याजाने पैसे देऊन त्याबदल्यात त्याच्या आईची पिरटाकळी (ता. मोहोळ) येथील शेतजमीन दिनेशकुमार बिराजदार याच्या नावावर करुन घेतली होती. तसेच सिध्दाराम बिराजदार व खंडू सलगरकर हे दोघेही सुखकर्ता फायनान्सचे भागिदार असून त्यांनीही अमोलला पैसे व्याजाने दिले होते. तसेच दशरथ मधुकर कसबे (रा. मुकुंद नगर, भवानी पेठ) यानेही अमोलला व्याजाने पैसे दिले होते. त्याबदल्यात अमोलकडून कोरे स्टॅम्प पेपर व चेक घेतले होते. या सर्वांनी पैशासाठी अमोलच्या मागे तगादा लावला होता. शिवीगाळ व दमदाटीही सुरु केली होती. तसेच मुलांना पळवून नेण्याची धमकीही दिल्याचे तपासांत उघड झाले आहे. खासगी सावकारकीचा परवाना नसतानाही यांनी व्याजाने पैसे दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी ज्या-ज्या व्यक्‍तींना व्याजाने पैसे देऊन त्रास दिला आहे, त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आयुक्‍तालयाकडून करण्यात आले आहे. 

दोघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी 
सिध्दाराम मलप्पा बिराजदार (रा. वारद चाळ, मुरारजी पेठ) आणि खंडू सुरेश सलगरकर (रा. सैफूल, कित्तुरचनम्मा नगर) या दोघांना न्यायालयासमोर हजर केले होते. त्यांना न्यायाधीश एस. व्ही. पवार यांनी 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठवली. तर दिनेशकुमार उर्फ बंडू दिलीप बिराजदार हा न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. देवमाने यांनी काम पाहीले, तर संशयित आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे व ऍड. विनोद सुर्यवंशी यांनी काम पाहीले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Laxman Jadhav arrested in Amol Jagtap suside case