कापूस उत्पादन यंदा 25 टक्‍क्‍यांनी वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कपाशीचे उत्पादन भरघोस येणार आहे. कापूस उत्पादन 20 ते 25 टक्के अधिक येऊन जिनिंग प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत.

जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कपाशीचे उत्पादन भरघोस येणार आहे. कापूस उत्पादन 20 ते 25 टक्के अधिक येऊन जिनिंग प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत. शासनाने कपाशीला यंदा पाच हजार 550 भाव जाहीर केला आहे. खासगी व्यापारी मात्र 4800 ते 5200 पर्यंत भाव देण्याची शक्‍यता आहे. 

खानदेशात मुख्य पीक कपाशी आहे. नगदी पीक म्हणून बहुतांश शेतकरी कपाशीचे उत्पादन घेतात. गेल्या चार वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस अनियमित होता. यामुळे कपाशीचे उत्पादन मर्यादित राहिले. यंदा मात्र चांगला पाऊस झाल्याने कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा शेतकऱ्यांनी सात लाख हेक्‍टरवर कपाशीचा पेरा केला. त्यात 25 टक्के अधिक उत्पादन अपेक्षित आहे. 

साधारणतः दहा ते पंधरा ऑक्‍टोबर दरम्यान नवीन कापूस बाजारपेठेत येतो. यंदा अजूनही पाऊस सुरू आहे. आगामी काही दिवसांत पाऊस परत गेल्यानंतर कपाशी वेचणी सुरू होईल. यात सुमारे एक महिन्याचा कालावधी जाईल. यामुळे एक नोव्हेंबरला नवीन कपाशीचा हंगाम सुरू होईल, असे चित्र आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीवर कपाशीचा भाव अवलंबून असतो. भारतातून दरवर्षी 40 ते 45 लाख कापसाच्या गाठी निर्यात होतात. यंदा त्यात पाच ते सहा लाख अधिक गाठींची भर पडेल. 

चांगल्या पावसामुळे 20 ते 25 टक्के कपाशीचे अधिक उत्पादन येणार आहे. व्यापाऱ्यांना हमीभावाएवढा दर देणे शक्‍य होणार नाही. यामुळे शासनाने भावांतर योजना सुरू करावी, जिनर्सला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात कपात करावी, आदी मागण्या शासनाकडे केल्या आहेत. 
- प्रदीप जैन, खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton production will increase by twenty-five percentage this year