ब्रेकिंग! यशोधरा हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा; कोरोना झालेल्या महिलेचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

तात्या लांडगे
सोमवार, 1 जून 2020

अंत्यविधीला गेलेले 19 जण क्वारंटाईन

करनिक नगर परिसरातील एक महिला श्वसनाचा (सारीचा) त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी ती यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, त्या महिलेचे स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच हॉस्पिटल प्रशासनाने त्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन टाकला. नातेवाईकांनी एकत्रित येऊन 27 मे रोजी त्या महिलेचा अंत्यविधी उरकला. त्यानंतर 28 मे रोजी त्या महिलेला कोरोना झाल्याची माहिती अहवालावरून स्पष्ट झाले. शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करीत संसर्गजन्य रोग पसरविण्यासाठी व इतरांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात घालण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर विठ्ठल सोड यांनी या बाबतची फिर्याद दिली आहे. तत्पूर्वी, त्या महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या 19 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

सोलापूर : शासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंबंधी वेळोवेळी सूचना व आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करीत रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेच्या कोरोना टेस्टचा अहवाल येण्यापूर्वीच तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन संसर्गजन्य रोग पसरण्यास व इतरांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात घालण्यास कारणीभूत ठरलेल्या यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरातील कोरोना या विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. तो कमी करण्याच्या हेतूने जिल्हा व महापालिका प्रशासन दिवसेंदिवस युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र यशोधरा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेचा मृतदेह अहवाल येण्यापूर्वीच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनाही त्या महिलेला कोरून झाल्याची पुसटशीही कल्पना नसल्याने नेहमीप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

करनिक नगर परिसरातील महिलेला सारी चा त्रास होऊ लागल्याने त्या महिलेच्या नातेवाईकांनी तिला यशोधरा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 26 मे रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, या महिलेचे स्त्राव नमुने घेण्यात आले होते. त्या महिलेचा अहवाल येण्यापूर्वीच यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाने तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि 27 मे रोजी त्या महिलेवर अंत्यसंस्कार झाले. 28 मे रोजी त्या महिलेचा कोरोना टेस्ट अहवाल प्राप्त झाला आणि ती महिला पॉझिटिव्ह निघाल्याने नातेवाईकांसह जिल्हा प्रशासनाची झोपच उडाली. आता विलगीकरण कक्षात असलेल्या 19 व्यक्तींचे स्त्राव नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले जाणार असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against Yashodhara Hospital; Corona handed over the body of the woman to relatives