
अतिवृष्टीने १५ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! मदतीसाठी लवकरच पंचनामे
सोलापूर : राज्यातील नांदेड, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, सोलापूरसह एकूण २६ जिल्ह्यातील १४ लाख १८ हजार ३०३ हेक्टरवरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाला आहे. तर ऑगस्टमधील पाच दिवसांतील अतिवृष्टीने ८१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविला जाणार आ
राज्यात खरीप पिकांखाली १५० लाख हेक्टर क्षेत्र आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये बहुतेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टी समजली जाते. त्यानुसार राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, नगर, सोलापूर व ठाणे जिल्हे वगळता उर्वरित बहुतेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर, नगर जिल्ह्यात ४३३ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जिल्हानिहाय पंचनाम्याचे अहवाल मागविण्यात आले आहेत. नुकसानीचे अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागामार्फत तो अहवाल मदत व पुनर्वसन विभागाला पाठविला जाणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार नुकसानग्रस्तांना मदतीची घोषणा होईल. पण, अजूनही काही जिल्ह्यातील पंचनाम्याचे अहवाल मिळाले नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान, ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात होतो. परंतु, मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने त्यासंदर्भात काहीच हालचाली सुरु नसल्याचेही मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी यावेळी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच होटगी (ता. दक्षिण सोलापूर) व मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतीपिकांचेही अतिवृष्टीने नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
विदर्भात केंद्रीय पथकाकडून पाहणी
जुलै महिन्यात विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभीवर केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. आता कृषी विभागाने बागायती, जिरायती क्षेत्रावरील कोणत्या पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यात फळबागांचे क्षेत्र किती आहे, याची माहिती मागविली आहे. पण, राज्य सरकारकडून अद्याप नुकसानग्रस्तांना मदतीची घोषणा झालेली नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, परंतु, तशी परिस्थिती नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.
Web Title: Crops On 15 Lakh Hectares Under Water Due To Heavy Rain Panchname Soon For
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..