esakal | दमदार पावसाची हजेरी; मराठवाड्याला पुन्हा तडाखा
sakal

बोलून बातमी शोधा

दमदार पावसाची हजेरी; मराठवाड्याला पुन्हा तडाखा

या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. उसाचे पीक भुईसपाट झाले. आल्यासह भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला. भात, सोयाबीन, कापूस, मका आणि फळबागांचेही नुकसान वाढले आहे.

दमदार पावसाची हजेरी; मराठवाड्याला पुन्हा तडाखा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. उसाचे पीक भुईसपाट झाले. आल्यासह भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला. भात, सोयाबीन, कापूस, मका आणि फळबागांचेही नुकसान वाढले आहे. पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सिंधुदुर्गात रविवारी सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडांसह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर जिल्ह्यातही पाऊस पडत आहे. पावसामुळे भात काढणी खोळंबली आहे. 

सांगली जिल्ह्यात जोर
सांगली जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहत असून सायंकाळीनंतर पावसाच्या सरी कोसळतात. जिल्ह्यात सलग दोन दिवस परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. सोयाबीन, भात आणि ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्षाची छाटणी सुरु आहे. या पावसामुळे द्राक्षाची फळ छाटणी थांबवावी लागणार आहे. जिल्ह्यात रविवारी (ता.११) सायंकाळी सहा नंतर मुसळधार पाऊस झाला. कडेगाव, आटपाडी, तासगाव, पलूस, तालुक्यात पावसाने झोडपून काढले. कडेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने येरळा, नांदणीसह नदी-ओढ्या नाल्यांना पूर आला. पलूस तालुक्‍यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यातही नुकसान
पुणे, सातारा, नगर, नाशिकमध्ये भात, सोयाबीन, ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले. सोमवारी (ता.१२) सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. नाशिक जिल्ह्यात पावसाने सोमवारी उघडीप दिली आहे. मात्र रविवार (ता.११) रोजी काही भागात हलक्या सरी झाल्या. मात्र सोयाबीन, बाजरी सोंगणीची व काढणीची कामे सुरू आहेत. तर, द्राक्ष छाटण्या सुरू आहेत, मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठवाड्यात दमदार
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. या पाच जिल्ह्यांतील १७ मंडळात सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये जालना जिल्ह्यातील ९, बीड मधील ६ तर औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळाचा समावेश आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विदर्भातही मध्यम ते जोरदार सरी पडल्याने कापसाचे नुकसान झाले. शेतीकामे खोळंबली आहेत. पावसाने उघडीप दिल्यास रब्बीची तयारी शेतकऱ्यांना करता येणार आहे.

कोकणात भात काढणी खोळंबली, भात ओला होऊन मोठे नुकसान
मराठवाडा, विदर्भात कापूस पीक संकटात, कापूस झाडावरच ओला होऊन वाती झाल्या 
सोयाबीनच्या गंजी भिजल्या, सायोबीनच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता
सलग दुसऱ्या दिवशी ऊस पीक जमीनदोस्त
अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, काही ठिकाणी पुराचे पाणी शेतात
ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागांवर कीड-रोगाची भीती, द्राक्षाची फळ छाटणी रखडली