नोटाबंदीच्या परिणामांची जबाबदारी सरकारवर - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांवर जे विपरीत परिणाम झाले आहेत, त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्यांना टाळता येणार नसून, सर्वांत वाईट परिणाम शेती उद्योग आणि लघु उद्योगावर झाला आहे. येत्या काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असून, विविध क्षेत्रांमध्ये कामगार कपातीचे संकट ओढावण्याची भीती माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्‍त केली आहे.

मुंबई - नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांवर जे विपरीत परिणाम झाले आहेत, त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्यांना टाळता येणार नसून, सर्वांत वाईट परिणाम शेती उद्योग आणि लघु उद्योगावर झाला आहे. येत्या काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असून, विविध क्षेत्रांमध्ये कामगार कपातीचे संकट ओढावण्याची भीती माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्‍त केली आहे.

देशाच्या आतमध्ये आणि सीमेवरही परिस्थिती गंभीर असून, दोन्ही ठिकाणी जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती, ती घेतली गेली नसल्याचा हल्ला करत पवार यांनी मोदी सरकारच्या वित्त आणि सीमा सुरक्षेच्या "सर्जिकल स्ट्राइक'वर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येणार असल्याने या निर्णयाचे समर्थन करण्याच्या भूमिकेवर ठाम राहत पवार यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारने जी व्यवस्था उभी करणे आवश्‍यक होते, त्यात सरकार पूर्णपणे अपयशी झाल्याचा शेरा आज येथे मारला.

नोटाबंदीमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेविषयी पवार यांनी पत्रकार परिषदेत चिंता व्यक्‍त केली. नोटाबंदीनंतर जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये पैसे भरण्यासाठी बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्‍त करत सर्वोच्च न्यायालयाने मात्र पैसे स्वीकारण्याचा आदेश कालच दिला असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सहकारात आहे, म्हणून असे केले जातेय, असे म्हणता येणार नाही. कारण गुजरातमध्ये सहकारात भाजप असल्याचीही पुष्टी त्यांनी या वेळी जोडली.

इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना जे धाडस दाखवले नाही, ते मी दाखवले, असे वक्‍तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते, त्याचाही समाचार पवार यांनी खास त्यांच्या शैलीत घेतला. ते म्हणाले, ""इंदिरा गांधींनंतर जेव्हा भाजपच्या हातात सत्ता होती, तेव्हा का नाही धाडस दाखवले? सतत 70 वर्षांचा उल्लेख केला जातो; पण त्यात तुम्हीही दहा वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री होता; पण सतत मी करतोय, मी करतोय म्हणणे योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

सीमेवर गंभीर परिस्थिती
देशाच्या सुरक्षा सीमा प्रथमच इतक्‍या असुरक्षित झाल्या असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधत चिंता व्यक्‍त केली. 4 फेब्रुवारी ते 9 डिसेंबर 2016 मध्ये 162 वेळा हल्ले झाले. त्यातले 104 सुरक्षा दलांवर झाले. त्यामध्ये 57 अधिकारी जवान हुतात्मा झाले. सीमेवरची गावे अस्वस्थ आहेत. सुरक्षा अधिकाऱ्यांवर हल्ले होणे गंभीर असून, हे ताबडतोब थांबायला हवे, अशी आवश्‍यकता त्यांनी व्यक्‍त केली.

राहुल गांधी यांनी मला लोकसभेत बोलायला दिल्यास भूकंप होईल, असे वक्‍तव्य केले होते. त्यांच्या या वक्‍तव्याची पवार यांनी यथेच्छ खिल्ली उडवली. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे भूकंप होऊन संसद भवन पडेल की काय? अशी भीती आम्हाला वाटत होती. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो; पण भूकंप काही झाला नाही. त्यामुळे आता आम्हाला शांत झोप येत असल्याचे त्यांनी मिश्‍कीलपणे सांगितल्याने पत्रकार परिषदेत हशा पिकला.

राजकीय निधीवर सावट
नोटाबंदीच्या निर्णयामुळे भाजप सोडला, तर कोणत्याही इतर राजकीय पक्षांकडे पैसा नसल्याने राजकीय पक्षांची आर्थिक अवस्था बिकट असल्याचे पवार यांनी मान्य केले. ते म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षाकडे पैसा नाही. उद्योगांकडून राजकीय पक्षांना धनादेशाद्वारे पैसे येतात; पण तेही येणे आता बंद झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: currency ban effet responsibility on government