esakal | Dabholkar Murder: हमीद दाभोलकर म्हणतात; "आरोप निश्चिती ही केवळ..."
sakal

बोलून बातमी शोधा

Dabholkar Murder: हमीद दाभोलकर म्हणतात; "आरोप निश्चिती ही केवळ..."

Dabholkar Murder: हमीद दाभोलकर म्हणतात; "आरोप निश्चिती ही केवळ..."

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी डॉ विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावरील आज आरोप निश्चित करण्यात आले आहे. मात्र आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले. यावर आता ३० सप्टेंबरला सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार आहेत.

ही आरोपनिश्चिती झाल्यानंतर त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, हा रस्ता अटळ आहे. लढणे हेच जिंकणे आहे. आठ वर्षे हा काही छोटा कालखंड नाही.आज आठ वर्षांच्या नंतर डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटल्या मध्ये आरोप निश्चिती झाली. कितीही उशीर झाला असला तरी हे एक महत्वाचे पाऊल आहे. उशीर झाला, न्याय मिळत नाही असे वाटत असले तरीही आपली लढाई सांविधनिक मार्गानेच लढायची ज्यांची इच्छा आहे त्यांना आपल्या देशात हा रस्ता अटळ आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आरोप निश्चिती ही केवळ आर्धी लढाई झाली. अजून खटला चालणे, हे दहशतवादी कृत्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होणे आणि त्या मागचे सूत्रधार पकडले जाणे. ही मोठी लढाई अजून बाकी आहे. माननीय मुंबई हाय कोर्टाची देखरेख ,डॉ नरेंद्र दाभोलकर ह्यांचे बलिदान न विसरलेले समाजमन आणि ते समाजाला विसरू न देणारे कार्यकर्ते आणि माध्यमे यांच्या मधूनच ही लढाई लढली जात आहे आणि इथून पुढे देखील लढली जाणार आहे. ह्या प्रवासात लढत राहणे हेच जिंकणे आहे.

आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे ही सुनावणी झाली. कोरोनाचे कारण सांगून आरोपींनी वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार देत आरोप निश्चिती झाली असून, गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा आरोपींना केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते, तर आरोपी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होते. सीबीआय तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले.

loading image
go to top