राज्यात दररोज पाच शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात म्हणून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बॅंक खात्यात दिला जातोय. दुष्काळ निधी, गारपीट, अवकाळी अनुदान सर्वांनाच दिले असून, काहींना मिळाले नसेल तर त्याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या जातील. संपूर्ण कर्जमाफीबद्दल काहीच सांगू शकत नाही. परंतु शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील पाच महिन्यांत दररोज सरासरी पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. सरकारी मदतीचा लाभ चालू वर्षातील आत्महत्याग्रस्त ८०९ शेतकऱ्यांपैकी २९३ कुटुंबांनाच लाभ मिळाला आहे.

दुष्काळामुळे विहिरी, विंधन विहिरी आटल्यामुळे शेती ओस पडली आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही, नागरिकांना प्यायला मुबलक पाणी नाही. खायला घरात धान्य नाही, रोजगारही नाही, असे चित्र राज्यभर आहे. तरीही सरकारकडून बहुतांश शेतकऱ्यांना दुष्काळ, पीकविम्याची पूर्ण रक्‍कम मिळालेली नाही. 

गारपीट, अवकाळीमुळे नुकसान झालेल्यांनाही मदतीची प्रतीक्षा आहे. मागील पाच वर्षांत राज्यात तब्बल १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ही संख्या वाढतच आहे. 

मुलांना शिकवायचे कसे?
दुष्काळामुळे शेती ओस पडली अन्‌ उदरनिर्वाह भागेना, बॅंकांचे कर्ज डोक्‍यावर असूनही कर्जमाफीचा लाभ नाही. मुलाला, मुलीला शिकविण्याचे स्वप्न सत्यात उतरणार नाही, याची जाणीव झाल्याने कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने एका मध्यरात्री कोणालाच काही न सांगता जीवन संपविले. तरीही सरकारला जाग येईना, मदतीसाठी मागील तीन महिन्यांपासून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र अद्याप चौकशीच सुरू असल्याचे उत्तर दिले जात आहे. 

आता बारावीचा निकाल लागल्याने मुलाला उच्च शिक्षणासाठी पाठवावे म्हटले तर पैसेच नाहीत, अशी आर्त कहाणी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेने बोलून दाखविली.

विभागनिहाय सद्यःस्थिती
(मागील पाच महिन्यांतील शेतकरी आत्महत्या)

औरंगाबाद - २०१
नाशिक - १९५
नागपूर - ५४
पुणे - ४७
अमरावती - ४२
एकूण - ८०९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily 5 Farmer Suicide in State