बंधारे उदंड, नदी कोंडली, अडला श्‍वास

Water-Issue
Water-Issue
Updated on

पाण्याशिवाय शेती अशक्‍य, जीवन त्याहून अवघड. बारमाही नद्या धरणे, बंधाऱ्यांनी अडवल्या. तरीही तहान काही भागेना! पण याच धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. कोरड्या ठाक नद्या, बंधाऱ्यांनी त्यांचा गुदमरणारा श्‍वास, यावर तोडगा शोधावा लागेल. जलसंधारणात नवनवे प्रयोग शोधताना पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.

खरंतर नदी म्हणजे अखंड प्रवाह. नदीची ही व्याख्याच आज संपुष्टात आली आहे. ज्या काळात धरणे नव्हती, त्या काळी पावसाळ्यात आणि त्यानंतरचा काही काळ नद्या वाहताना दिसायच्या. किंबहुना ती वर्षभरच वाहायची. प्राथमिक अभ्यासक्रमांमध्ये असेच शिकवले गेले. आज नद्यांची स्थिती खूपच वेगळी आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात १९०८ मध्ये राधानगरी धरण झाल्यानंतर, १९३३ मध्ये सांगरूळमधील शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर नदीपात्रात बंधारा बांधला. त्यात आडलेले पाणी उपसाद्वारे शेतीला वापरले. दरवाजाच्या मदतीने पाणी सोडले जायचे. हा कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा म्हणून ओळखला गेला. पुढे पंचगंगेवर कसबा बावडा येथे राजाराम बंधारा नावाने दुसरा बंधारा झाला. यामध्ये खाचा असलेले दगडी खांब केले, खाचांमध्ये लाकडी फळ्या अडकवल्या. दोन खाचांदरम्यान फळ्यांमधील रिकाम्या भागात माती भरली जाते. त्यामुळे पाणी अडवणे सोयीचे होते. पावसाळ्यात या फळ्या म्हणजेच बर्गे काढतात. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची सोपी आणि सुटसुटीत रचना राज्यातच नव्हे, तर देशातदेखील वापरली गेली. 

पंचगंगा आणि तिच्या पाच उपनद्या ३३५ किलोमीटर लांबीच्या आहेत. त्यावर ६४ बंधारे आहेत. राज्यात कृष्णेच्या २३७८ किलोमीटरच्या २० उपनद्यांवर १५७ बंधारे आहेत. ५ ते १० किलोमीटरदरम्यान बंधाऱ्याद्वारे नदी अडवली. त्यांच्यामुळे बारामाही शेतीला पाणी मिळते. तथापि, नदीच्या दुतर्फा असलेली गावे मैलामिश्रित सांडपाणी नद्यांमध्ये सोडताहेत. बहुतेक गावांमधला कचरा ओढ्या-नाल्यांनजीक टाकतात. मैलामिश्रित सांडपाणी आणि कचरा यातील तरंगणारे पदार्थ पाण्याच्यावर आणि जड पदार्थ तळाशी थांबतात. नदीपात्रातील मैला-सांडपाणी, घनकचरा, जैववैद्यकीय, घातक तसेच औद्योगिक कचरा बंधाऱ्यांदरम्यान साचतो. तो कुजतो. बंधाऱ्यातील पाणीपातळी घटते तेव्हा नदीच्या पाण्याला दुर्गंधी, काळा रंग येतो.

पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटते. पाणीप्रदूषण वेगाने होते. परिणामी या नद्यात जलपर्णी वाढते. 

नदीकडे कालव्यासारखे पाहून चालणार नाही. ती स्वतंत्र पर्यावरणीय परिस्थितिकी आहे. तिच्यामध्ये अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळे असतात. त्यांचा नदीचे पाणी आणि नदीकाठालगतचा परिसर याच्याशी अनन्यसाधारण नाते असते. किंबहुना नद्या आणि नाले यांचे जाळे हे त्या खोऱ्यातील जैवविविधता आणि पर्यावरणाशी घनिष्ठ संबंधांचे असते.

त्यापैकी कोणताही घटक नष्ट झाला वा आक्रमक झाला तर परिस्थितीकीला, जैवविविधतेला मोठी हानी पोहोचते. नद्यांमध्ये प्रदूषण, जलपर्णी वाढली की, पाण्याची वानवा होते. नदीमधील अनेक सजीव नष्ट होतात. पंचगंगेचे उदाहरण घ्यायचे तर, १९७२ मध्ये केलेल्या अभ्यासात नदीमध्ये सत्तर जातीचे मासे होते. २००९ मध्ये त्यांची संख्या तीसवर आली. याचा अर्थ चाळीस जाती प्रदूषणामुळे नष्ट झाल्या. हीच अवस्था राज्यातील सगळ्या नद्यांमध्ये कमी-अधिक फरकाने दिसते. 

राष्ट्रीय जलधोरणामध्ये सोळा टक्के पाणी हे नदीच्या पर्यावरणासाठी म्हणजेच नदीचा प्रवाह सतत राहावा, यासाठी ठेवावे असे म्हटले आहे. परदेशात अनेक ठिकाणी अशा बंधाऱ्यांमध्ये तळाकडील भागातून पाणी वाहून पुढे जाण्यासाठी रचना असते किंवा तसे दरवाजे असतात. तसेच नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने येणाऱ्य माशांसारखा जीवांना वर येण्यासाठी स्वतंत्र वाट असते. आपल्याकडे अशी कोणतीच रचना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात नसल्याने पाण्याचा प्रवाह खंडित होतो. प्रदूषणासह पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची रचना बदलून तळाकडील भागामधून पाणी वाहते राहील, अशी करावी. याबाबत जलसंपदा विभागाच्या अभियांत्रिकी विभागाकडे पाठपुरावा करून त्याला दाद मिळालेली नाही. 

नद्या वाहत्या ठेवता येतील, असे नियोजन आणि रचना करावी. अन्यथा भरपूर असूनही पाणी वापरता येणार नाही. एका अर्थाने कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आजच्या काळात व्यवहार्य नाहीत, हे स्पष्ट होते. त्यांची रचना बदलून नद्या वाहत्या ठेवल्या नाहीत, तर नदीपात्रात गटार सदृश्‍य स्थिती पाहायला मिळेल.


थेंब थेंब पाणी वाचवूया!
उभ्या महाराष्ट्राला कमी-अधिक प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही भागाचा जीव तहानेने कासावीस झाला आहे. अशा स्थितीत आणि तज्ज्ञ सांगतात त्यानुसार पाण्याची चैन आता आपल्याला परवडणारी नाही. चला, थेंब थेंब पाणी वाचवूया! घरापासून शेतीपर्यंत आणि उद्योगधंद्यांपासून ते व्यवसायापर्यंत अशा प्रत्येक पातळीवर प्रत्येकाने यासाठी काही अभिनव प्रयोग राबवले आहेत. कसे वाचवले थेंब थेंब पाणी, ते तुम्ही जरूर छायाचित्रासह कळवा, इतरांना ते अनुकरणीय ठरेल. 

संपादक, सकाळ,
५९५, बुधवार पेठ, पुणे ४११ ००२
किंवा 
webeditor@esakal.com 
या ई-मेल पत्त्यावर पाठवा. यातील निवडक 
प्रयोगांना प्रसिद्धी दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com