
solapur-barshi crime
sakal
सोलापूर : लुखामसला (जि. बीड) येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाडवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयीन कोठडीतील पूजाने जामिनासाठी अर्ज केला होता. पण, ‘पूजाला जामीन दिल्यास समाजात चुकीचा मेसेज जाईल, तिच्यासारख्या महिलांकडून अनेक पुरुषांचा आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य मानून न्यायालयाने पूजाचा जामीन नाकारला.
माजी उपसरपंच गोविंद हा ठेकेदार होता. कला केंद्रात ये-जा करण्यातून पारगाव (जि. धाराशिव) येथील तुळजाभवानी कला केंद्रातील नर्तिका पूजासोबत त्याची ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर पूजा म्हणाली, ‘मी तुमची आजपासून मालकीण म्हणून काम करते, पण तुम्ही माझा घरखर्च व घरसंसार पाहायचा.’ आनंदी झालेल्या गोंविदने पूजाला महागडे मोबाईल, बुलेट, घर बांधकामासाठी पैसे, वैराग येथे खुली जागा, नातेवाइकांच्या नावे शेतजमीन, दागिने दिले. पण, कालांतराने पूजाने गोविंदसोबत बोलणे बंद केले.
त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. तत्पूर्वी, बंगला आणि पाच एकर जमीन मला दे, नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी पूजाने दिली होती. त्या मानसिक तणावातून गोविंदने सासुरे (ता. बार्शी) येथील पूजाच्या घरासमोर ९ सप्टेंबरला गोळी झाडून आत्महत्या केली होती. गोविंदच्या मेव्हण्याच्या फिर्यादीवरून १० सप्टेंबरला पूजाला वैराग पोलिसांनी अटक केली होती. तिच्या जामिनावर बार्शीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी (ता. १७) सुनावणी पार पडली. यावेळी सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी बाजू मांडली.
गोविंदच्या आलिशान बंगल्याचा मोह अन्...
एकेदिवशी गोविंदने गावाकडील बंगल्याबद्दल पूजाला सांगितले. तिने बंगला पाहण्याचा हट्ट धरला आणि गोविंद तिला बंगला दाखवायला घेऊन गेला. बंगल्यात राहून परतलेल्या पूजाला कोट्यवधींचा तो आलिशान बंगला पाहिजे होता. त्यासाठी पूजाने गोविंदकडे सतत हट्ट धरला आणि त्या बंगल्याची मागणीच गोविंदसाठी काळ ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.