Dasara Melava : गुलाल उधळत वाजत गाजत या!; उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav thackeray

Dasara Melava : गुलाल उधळत वाजत गाजत या!; उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण

मुंबई : ‘‘दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दसरा मेळाव्यासाठी उत्साहात, गुलाल उधळत वाजत गाजत या,’’ असे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले. त्याचबरोबर आपल्या या तेजस्वी परंपरेला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शिवसेना कोणाची या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात गेली तीन महिने सुनावणी सुरू असताना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना आणि शिंदे गटानेही दावा केला होता. मुंबई महापालिकेने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत ही परवानगी दोन्ही गटांना नाकारली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे यांना परवानगी दिल्याने शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’पासून शिवसेनाभवनातही फटाके फोडून आणि ढोलताशे वाजवून हा आनंद साजरा करण्यात आला. न्यायालयाने मेळाव्यासाठी परवानगी देताना कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देशही शिवसेनेला दिले आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्घव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांना मेळाव्याला येताना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असेल असे कोणतेही वर्तन करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. इतर काय करतील माहिती नाही, अशी शंका त्यांनी शिंदे गटाविषयी व्यक्त केली.

हा लोकशाहीचा विजय

राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर शिवसेनेसाठी प्रथमच आश्वासक असा निर्णय लागलेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, की न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला. हा लोकशाहीचा विजय आहे. न्यायालयाने कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकलेली आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल अशी मला आशा वाटते. शिवसेनेचे दोन गट झाले असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर ठाकरे यांनी शिवसेना एकच आहे, बाहेर पडून ते गेले. पण त्यानंतर शिवसेना वाढली आणि फोफावलेली आहे. परवाचा मेळावा हा फक्त मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा होता,’’याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पंरपरा कायम राखणार

विजयादशमीच्या निमित्ताने चांगली सुरूवात झालेली आहे. पहिल्या मेळाव्याला माझे आजोबा तिथे होते, ज्यांचे भाषण माझ्याकडे अजूनही आहे. माझ्या वडिलांनी जी परंपरा सुरू केली तीच परंपरा दसरा मेळाव्याची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. कोरोनाचा काळ गेला तर कधीही दसरा मेळाव्याची परंपरा आम्ही चुकवलेली नसल्याचे ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा

सर्वोच्च न्यायालयात येत्या २७ रोजी सुनावणी आहे. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ शिवसेनेसाठी नाही तर देशाच्या लोकशाहीचे भविष्य आणि भवितव्याचा निकाल ठरवणारा असणार आहे. देशाची लोकशाही कशी, किती काळ राहिल याकडे सर्व जगाचे लक्ष आहे.’’

सत्यमेव जयते! आपला दसरा हा शिवतीर्थावरच. विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय!

- आदित्य ठाकरे, युवासेना अध्यक्ष

मी न्यायालयाला धन्यवाद देतो. हा निकाल म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय आहे.

- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते

Web Title: Dasara Melava High Court Result Shiv Sena Uddhav Thackeray Invitation Maharashtra News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..