Dasara Melava : "त्यादिवशी अंगात संचारलं"; संजय राऊतांची आठवण काढत सुषमा अंधारे म्हणाल्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare Sanjay Raut
Dasara Melava : "त्यादिवशी अंगात संचारलं"; संजय राऊतांची आठवण काढत सुषमा अंधारे म्हणाल्या...

Dasara Melava : "त्यादिवशी अंगात संचारलं"; संजय राऊतांची आठवण काढत सुषमा अंधारे म्हणाल्या...

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा चांगलाच गाजतोय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यामध्ये नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांचं भाषण चांगलंच गाजलं. अनेक तज्ज्ञ, राजकीय विश्लेषकांकडून त्यांचं कौतुक होत आहे. या भाषणाबद्दलचे काही अनुभव त्यांनी कथन केले आहेत. यावेळी आपल्या भाषणादरम्यान, आपल्या अंगात काहीतरी संचारल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच संजय राऊतांची आठवणही त्यांनी काढली आहे.

हेही वाचा: Shivsena: फडणवीसजी तुम्ही जिंकलात, तुमचं अभिनंदन; सुषमा अंधारे यांचं सूचक ट्विट

सुषमा अंधारे एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणाबद्दलचे अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, माझी त्यावेळी गाळण उडाली होती. तेव्हा मी विचार केला की आपण कोणाला मानतो, तर सगळ्या महापुरुषांना. मग मी तथागतांपासून फातिमाबी शेख पर्यंत सगळ्यांचा मनात नामोल्लेख केला आणि भाषण केलं. अखेर ते संपलं. मला आजही कळलं नाही, की ते गमचा फिरवण्याचं मला कसं सुचलं? ते इतकं ऐनवेळी सुचलं म्हणजे अंगात येण्यावर माझा विश्वास नाही, पण त्या दिवशी माझ्या अंगात काहीतरी संचारलं होतं.

हेही वाचा: Uddhav Thackeray Speech : Shivsena Dasara Melava : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं UNCUT भाषण

अंधारे पुढे म्हणाल्या की, "विरोधकांना कुठेही वाटू नये की शिवसेना गलितगात्र झालीय, आम्ही हरलोय, असं कुठेही वाटू नये. मला ते स्पिरीट जागवायचं होतं आणि मला ती माझी जबाबदारी आहे, असं वाटलं. आम्ही रडणारे नाही, तर लढणारे लोक आहोत. ते मला जागवायचं होतं. म्हटलं, घोषणा द्याव्यात, पण घोषणा तर सगळ्याच देतात. मग माझ्या लक्षात आलं, माझ्या गळ्यात गमछा होता. संजय राऊतांनी ईडीची कारवाई झाली, तेव्हा गळ्यातला भगवा रुमाल फिरवला होता. मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. मग मी ठरवलं की आपण हे केलं पाहिजे. योगायोगाने गळ्यातला रुमाल फिरवत हे संजय राऊतांचं स्पिरीट आहे, म्हणत भाषण दिलं. अजूनही माझ्या अंगावर शहारा येतोय.