‘डीएड’चं खूपच अवघड झालयं! 44.50 अन्‌ 49.50 टक्के गुण मिळालेल्यांनाही प्रवेश! बारावी निकालानंतर यंदाही पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया

७५- ८० टक्के गुण असूनही एकेकाळी ‘डीएड’ला प्रवेश मिळत नव्हता. आता मात्र खुल्या प्रवर्गातील ४९.५० टक्के तर इतर प्रवर्गातील ४४.५० टक्के गुण घेतलेल्यानाही डीटीएड करता येत असल्याची वस्तुस्थिती आहे. तरीदेखील, ४५ ते ६० टक्के प्रवेश रिक्तच राहतात हे विशेष.
Teacher Cartoon Image
Teacher Cartoon Imagesakal

सोलापूर : बीएएमएस, बीएचएमएस या कोर्सला प्रवेश नको, पण मला ‘डीटीएड’ करून शिक्षकच व्हायचे आहे ही मानसिकता आता राहिलेली नाही. ७५ ते ८० टक्के गुण असूनही एकेकाळी प्रवेश मिळत नव्हता. आता मात्र खुल्या प्रवर्गातील ४९.५० टक्के तर इतर प्रवर्गातील ४४.५० टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही डीटीएड करता येत असल्याची वस्तुस्थिती आहे. तरीदेखील, ४५ ते ६० टक्के प्रवेश रिक्तच राहतात हे विशेष.

सोलापूर जिल्ह्यात कधीकाळी ६०हून अधिक ‘डीटीएड’ महाविद्यालये होती, पण आता राहिली अवघी २९च महाविद्यालये अशी स्थिती आहे. २००५-०६ ते २००८-०९ पर्यंत ‘डीटीएड’ला खूप महत्त्व होते. विज्ञान, वाणिज्य या शाखांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण घेतलेले विद्यार्थ्यांची देखील ‘डीटीएड’लाच पसंती होती. मात्र, आता कला शाखेत ६५ ते ७० टक्के गुण घेतलेला विद्यार्थी पण डीटीएड नको म्हणत आहे. त्याचे कारण म्हणजे वेळेवर न होणारी शिक्षक भरती असल्याचे सांगितले जाते.

२०१० नंतर सात वर्षांनी म्हणजेच २०१७ आणि त्यानंतर २०२३-२४ मध्ये शिक्षक भरती झाली. डीटीएड करून टीईटी उत्तीर्ण झालेले लाखो तरुण स्वत:चा व्यवसाय किंवा मजुरी करीत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यात पुन्हा विद्यार्थी कमी झाल्याने अतिरिक्त होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांची पसंती अभियांत्रिकी, फार्मसी, सीए अशा कोर्सला सर्वाधिक असल्याने डीटीएड महाविद्यालये ओस पडली आहेत. मात्र, नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर डीटीएड व बीएड या कोर्सला चांगले दिवस येतील असा तज्ज्ञांना विश्वास आहे.

भविष्यात मिळू शकते करिअरची मोठी संधी

शाळांमधील रिक्त शिक्षकांची भरती शासनाच्या माध्यमातून पवित्र पोर्टलद्वारे नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे ‘डीटीएड’ कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची संधी निर्माण होऊ शकते. आता इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यावर ‘डीटीएड’ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. इच्छुकांना https://www.mscert.org.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.

- डॉ. जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, डायट, सोलापूर

यंदाही पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया

राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणांनुसार डीटीएड, बीएड याऐवजी पाच वर्षांचा एकच इंटिग्रेटेड कोर्स असणार आहे. पण, त्याची सुरवात अद्याप झाली नसून २०३० पूर्वी सर्वत्र हा इंटिग्रेटेड कोर्स सुरु होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सध्या सुरु असलेल्या डीटीएड व बीएड महाविद्यालयांनी स्वत:मध्ये बदल करून घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार त्यांनी शासनाला प्रस्ताव देणे अपेक्षित आहे, मात्र प्रवेशाअभावी अनेक महाविद्यालयांना टाळेच लावावे लागत असल्याची सद्य:स्थिती आहे. तरीपण, नवीन धोरण लागू होईपर्यंत प्रचलित पद्धतीनुसारच ‘डीटीएड’चे प्रवेश होणार आहेत.

जिल्ह्यातील ‘डीटीएड’ची सद्य:स्थिती

  • एकूण महाविद्यालये

  • २९

  • प्रवेश क्षमता

  • १५००

  • अंदाजे रिक्त प्रवेश

  • ९००

  • ‘डीटीएड’साठी टक्केवारी

  • ४४.५० ते ४९.५० टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com