
माझे वडील राम नगरकर यांचं नगर जिल्ह्यातील सारोळे हे छोटंसं गाव. काही कारणामुळे आम्हाला 1947 पूर्वी मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं. माझ्या वडिलांचं फारसं शिक्षण झालं नव्हतं. ते राष्ट्र सेवा दलात जायला लागले. तिथं त्यांचा परिचय एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे तसेच निळू फुले, दादा कोंडके यांच्याशी झाला. हे सर्वजण पथनाट्यातून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचे. यातूनच वडिलांच्या कलाप्रवासाची बीजे रोवली गेली.
कला पथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि माझ्या वडिलांनी "विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य सुरू केलं. याचे हजारो प्रयोग झाले. त्यामुळे कोंडके आणि नगरकर हे नाव घराघरांत पोचलं. नंतर निळू फुले आणि नगरकर यांचं "राजकारण गेलं चुलीत' आणि "कथा अकलेच्या कांद्याची' या दोन लोकनाट्यांनी धुमाकूळ घातला. सत्तरच्या दशकात आलेला "हऱ्या नाऱ्या झिंदाबाद' हा चित्रपटही खूप गाजला. "बायांनो नवरे सांभाळा', "लक्ष्मी' आणि "एक डाव भुताचा' हे चित्रपटही हीट झाले. चित्रीकरण किंवा नाटकाच्या प्रवासादरम्यानचे किस्से एकत्र करून वडिलांनी "रामनगरी' हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. याला प्रस्तावना होती पु. ल. देशपांडे यांची. हे पुस्तकं अभिनेते अमोल पालेकर यांनी वाचलं. त्यावर त्यांनी "रामनगरी' हा हिंदी चित्रपट काढला. त्यात प्रमुख भूमिकाही राम नगरकर व निळू फुले यांनी साकारली. त्याच दरम्यान नाटककार आणि लेखक सुरेश खरे यांनी "रामनगरी' हा एकपात्री कार्यक्रम सुरू करण्याची संकल्पना मांडली. याला वडिलांनी होकार दिला. दरम्यान त्यांनी 1986 मध्ये वडिलांनी अमेरिकेचा दोन महिन्यांचा दौरा केला. निळू फुले आणि राम नगरकर यांचे पाय जमिनीवरच होते. आमचं "वंदन हेअर कटिंग सलून' हे पुण्यातील प्रसिद्ध दुकान. कार्यक्रम नसतील तेव्हा या दुकानाच्या बाहेरील कट्ट्यावर निळूभाऊ आणि रामभाऊ पानसुपारी खात बसायचे.
माझ्या वडिलांचे 8 जून 1995 रोजी निधन झाले. त्यावेळी निळूभाऊंनी आमच्या पाठीवर मायेचा हात ठेवून धीर दिला. असेच एकदा निळूभाऊ घरी आले अन म्हणाले, "वंदन मला आठवण म्हणून रामभाऊंचा तो अडकित्ता हवा आहे.' हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. निळू फुले आणि राम नगरकर यांनी "हऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या चित्रपटात सख्या भावांची भूमिका साकारली होती. पण प्रत्यक्ष आयुष्यातही हे नातं त्यांनी निभावल होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.