धक्‍कादायक! कोविड केअर सेंटरमधील महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा गोंधळ अन्‌ प्रशासनाचे चौकशीचे आदेश

तात्या लांडगे
Wednesday, 29 July 2020

दोषींवर कारवाई निश्‍चितपणे होईल 
वालचंद महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमधील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार महिलेच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. तेथील विभागप्रमुख आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर त्याठिकाणच्या दोषींवर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. 
- पंकज जावळे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका 

सोलापूर : अक्‍कलकोट रोडवरील कोंडा नगर परिसरातील 68 वर्षीय महिलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍ती म्हणून वालचंद कॉलेजमधील मुलांच्या वस्तीगृह येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्यानंतर तीन दिवसांपासून त्रास होत असतानाही त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्याचाही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विजय खोराटे, उपायुक्‍त पंकज जावळे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. 

 

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील तथा लक्षणे नाहीत, परंतु कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. संपर्कातील व्यक्‍तींचा स्वॅब सात ते दहा दिवसांत घेतला जातो. तोवर एका खोलीत तिघांना ठेवले जाते, अशा नोंदी सेंटरवरील रजिस्टरमध्ये आहेत. मात्र, प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच असून एका खोलीत किमान सात ते नऊ व्यक्‍तींना ठेवले जात असल्याच्या तक्रारी, यावेळी वालचंद महाविद्यालयातील सेंटरमधील नागरिकांनी नगरसेवकांकडे केल्या. तर दुसरीकडे मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच सर्वोपचार रुग्णालयातून प्रेत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. नगरसेवक विठ्ठल कोटा यांनी हरकत घेतल्यानंतर रिपोर्ट पाहण्यात आला. त्यावेळी संबंधित महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला. घटनास्थळी नागरिकांचा गोंधळ होऊ लागल्याने नगरसेवक प्रथमेश कोठे, राजकुमार हंचाटे, विठ्ठल कोटा, गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, मकरंद काळे, पोलिस उपायुक्‍त बापू बांगर, पोलिस निरीक्षक जाफर मोगल यांनी भेट दिली. 

 

दोषींवर कारवाई निश्‍चितपणे होईल 
वालचंद महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमधील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार महिलेच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. तेथील विभागप्रमुख आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर त्याठिकाणच्या दोषींवर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. 
- पंकज जावळे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका 

 

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने 68 वर्षीय महिलेला कोविड केअर सेंटरमध्ये आणले. त्यानंतर त्यांना तीन दिवसांपासून त्रास होता, तरीही त्यांच्यावर काहीच उपचार करण्यात आले नाहीत. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित असतानाही काहीच कार्यवाही झाली नाही. या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली आहे. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of a woman at Covid Care Center; Confusion of relatives and order of inquiry by the administration