धक्‍कादायक! 'त्या' कर्जबाजारी हॉटेल व्यावसायिकाला सावकारांनी दिली होती मुलांना पळवून नेण्याची धमकी 

तात्या लांडगे
Friday, 17 July 2020


पोलिसांनी केलेल्या तपासानुसार... 

  • अमोल जगताप याच्या डोक्‍यावर होता 70 ते 80 लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा 
  • हैदराबाद रोडवरील सावकार व्यंकटेश बंदनगिरी याने दिले होते सात लाखांचे कर्ज 
  • व्याजाने दिलेल्या पैशापोटी अमोलने केले होते हॉटेलचे खासगी सावकाराच्या नावे खरेदीखत 
  • मोबाइल रेकॉर्ड आणि चिठ्ठीतील मजकुरानुसार या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश 
  • वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्याकडून सुरु आहे सखोल तपास 

सोलापूर : लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय साडेतीन महिन्यांपासून बंद होता. त्यामुळे खासगी सावकारांचे 70 ते 80 लाख रुपयांचे देणे वेळेत फेडणे अशक्‍य झाले आणि काही खासगी सावकारांनी देण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी सुरु केली. मुलांना पळवून नेण्याच्याही धमकी त्या खासगी सावकारांनी दिली. या सर्व गोष्टींना वैतागून अमोल अशोक जगताप याने स्वत:सह दोन चिमुकल्यांना व पत्नीला गळफास देऊन मारल्याचे आता पोलिस तपासात समोर आले आहे. 

जुना पुना नाका परिसरातील हांडे प्लॉट येथे भाड्याच्या इमारतीत राहणाऱ्या अमोल जगतापचे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे गॅलक्‍सी हॉटेल, ऑर्केस्ट्रा बार होता. लॉकडाउनमुळे काही महिने हॉटेल बंद राहिल्याने अमोल जगतापच्या डोक्‍यावरील खासगी सावकारांच्या कर्जाचा बोजा वाढला होता. अशावेळी सावकारांनी अमोलकडे पैशासाठी तगादा लावला. या टेन्शनमध्ये अमोलने पत्नीची इच्छा नसतानाही तिला गळफास देऊन मुलांनाही गळफास दिला आणि शेवटी स्वत:ही गळफास घेतला. मात्र, मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी आणि त्याच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्डवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी तपास केला. त्याआधारे शुक्रवारी (ता. 17) हैदराबाद रोडवरील व्यंकटेश पंपय्या डंबलबिनी (रा. ऍग्रो इंडस्ट्रीज मार्केट यार्डसमोर, हैदराबाद रोड) याला पोलिसांनी अटक केली. मृत अमोल जगताप याच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड आणि डंबलबिनी याच्या नावे हॉटेलचे असलेले खरेदीखत, या अनुषंगाने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी आता मुलांना पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या सावकारांचा शोध सुरु केला आहे. 

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार... 

  • अमोल जगताप याच्या डोक्‍यावर होता 70 ते 80 लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा 
  • हैदराबाद रोडवरील सावकार व्यंकटेश बंदनगिरी याने दिले होते सात लाखांचे कर्ज 
  • व्याजाने दिलेल्या पैशापोटी अमोलने केले होते हॉटेलचे खासगी सावकाराच्या नावे खरेदीखत 
  • मोबाइल रेकॉर्ड आणि चिठ्ठीतील मजकुरानुसार या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश 
  • वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्याकडून सुरु आहे सखोल तपास 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The debtor had threatened the hotelier to kidnap the children