मराठीचा आवाज कदापी दबणार नाही ;अजित पवारांची बेळगाव घटनेवर प्रतिक्रिया l Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

मराठीचा आवाज कदापी दबणार नाही ; पवारांची बेळगाव घटनेवर प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra Ekikaran Samiti ) नेते दीपक दळवी (Deepak Dalvi)यांच्यावर बेळगाव (Belguam) येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठीभाषक चळवळ आणखी जोमाने उसळी घेऊन पुढे जाईल. या घटनेमुळे मराठी भाषक एकदिलाने एकत्र येत लढा आणखी मजबूत करतील. एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींसह मराठीभाषक चळवळीच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असे ठणकावून सांगत मराठीचा आवाज कदापी दबणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला, ते आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात, सीमाागातील मराठी भाषकांचा हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणे, सीमाागातील मराठी बांधव सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने लढत आहेत, त्यांच्या पाठीशी राहणे, हे आमचे कर्तव्य आहे.

हेही वाचा: बेळगावात समितीच्या अध्यक्षांवर भ्याड हल्ला; मराठी भाषिक संतप्त

मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. मराठी भाषक चळवळीला धक्का देण्यासाठी हे भ्याड कृत्य सुनियोजित पध्दतीने करण्यात आले असावे. मात्र, अशा घटनांमुळे मराठीभाषक आंदोलनावर, चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. लढणं हे मराठी भाषकांच्या रक्तात आहे, त्यामुळे मराठी भाषकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल, तेवढी मराठी भाषकांची चळवळ आणखी उसळी घेईल. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मराठी सैनिकाच्यामागे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.