पोलिसांचा "सायवॉर'शी लढा! 

अनिश पाटील  
सोमवार, 20 जानेवारी 2020

एखादा संदेश आला की कर तो "फॉरवर्ड' करण्याची स्पर्धाच लागलेली असते. अशातच अनेक प्रक्षोभक संदेश प्रसारित होतात. मुंबई पोलिस अशा संदेशांवर करडी नजर ठेवून आहेत.

मुंबई - एखादा संदेश आला की कर तो "फॉरवर्ड' करण्याची स्पर्धाच लागलेली असते. अशातच अनेक प्रक्षोभक संदेश प्रसारित होतात. मुंबई पोलिस अशा संदेशांवर करडी नजर ठेवून आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये यासाठी मनोवैज्ञानिक लढाई, अर्थात "सायवॉर'शी दोन हात करत आहेत. दररोज किमान 35 प्रक्षोभक पोस्ट हटवल्या जात आहेत. मुंबई पोलिसांच्या "सोशल मीडिया लॅब'ने 2019 मध्ये 12,537 प्रक्षोभक पोस्ट समाज माध्यमांतून हटविल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी दहशतवादी विचारसरणीच्या, चिथावणीखोर 1315 पोस्ट पोलिसांनी "डिलिट' केल्या. विशेष शाखेच्या सोशल मीडिया लॅबने 2018 मध्ये 6207 प्रक्षोभक पोस्ट हटवल्या होत्या. त्यात 2019 मध्ये दुपटीने वाढ झाली. गतवर्षी 12,537 प्रक्षोभक पोस्ट पोलिसांनी हटवल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, शिवसेना-भाजप यांच्यातील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला संघर्ष, काश्‍मिरातून 370 कलम रद्द, अयोध्येतील राम मंदिराबाबतचा निकाल, "जामिया मिलिया', "जेएनयू'मधील हिंसाचार, "सीएए-एनआरसी'विरोधी आंदोलने आदी महत्त्वपूर्ण घटना घडल्या. समाज माध्यमांवरही या घटनांबाबत भरपूर वादळ उठले होते. समोरच्या विचारसरणीविरोधात "पर्सेप्शन' तयार करण्यासाठी प्रक्षोभक संदेशांची संख्याही त्यामुळे वर्षभरात दुपटीने वाढल्याचे जाणकारांचे मत आहे. 

याशिवाय 2018 व 2019 या दोन वर्षांत हटवण्यात आलेल्या प्रक्षोभक पोस्टमध्ये 2830 पोस्ट दहतवादी विचारसरणी पसरवणाऱ्या, माथी भडकवणाऱ्या, धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणाऱ्या होत्या. 2019 मध्ये अशा 1315 पोस्ट हटवण्यात आल्या. त्यात इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित विचारसरणी असलेल्या पोस्टची संख्या अधिक होती. 

30 जणांचे पथक 
24 तास सेवेत 

प्रक्षोभक संदेश पसरवणाऱ्या तीन व्यक्ती मुंबई पोलिसांच्या रडारवर आल्या होत्या. त्यांच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. अशा प्रकरणांबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच सर्व पोलिसांना देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. समाजमाध्यमांवरील संशयित पोस्टवर मुंबई पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाते. त्यासाठी 30 पोलिसांचे पथक विविध शिफ्टमध्ये 24 तास तैनात करण्यात आले आहे. 

हटविलेल्या पोस्ट 
12,537 - 2019 मध्ये 
6207 - 2018 मध्ये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deleted 2830 posts of terrorist ideology