मुस्कटदाबी सहन करणार नाहीः धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

ईडी कारवाई करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यकर्त्यांची धरपकड करुन दबावतंत्राचा वापर केला जात आहे. पण, मुस्कटदाबी सहन करणार नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंबई : देशात लोकशाही आहे की नाही? आचारसंहिता लागल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कारवाई सुरू करण्यात आली. ईडी कारवाई करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यकर्त्यांची धरपकड करुन दबावतंत्राचा वापर केला जात आहे. पण, मुस्कटदाबी सहन करणार नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, नोटीस नसतानाही शरद पवार ईडी कार्यालयात स्वत:हून हजर राहणार आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात सत्तेची मस्ती आली आहे. आमच्या कारवाई का केली? याबाबत विचारणा करण्याचा आम्हाला अधिकार आहे. कार्यकर्त्यांची धरपकड करुन दबावतंत्राचा वापर केला जात आहे. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ईडी आणि पोलिसांची आहे. कायदा हातात न घेता मुस्कटदाबी होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सहन करणार नाही. देशातील लोकशाही संकटात आहे.'

दरम्यान, ईडीने शरद पवार यांची तूर्तास चौकशीची गरज नाही, भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही, असे पत्र ईडीने शरद पवार यांना दिले आहे. मात्र, शरद पवार यांनी अद्याप पत्र आले नसल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: democracy crisis country if there going be problem we will not tolerate it says dhananjay munde