esakal | भाजपकडून पदवीधरसाठी देशमुखच पण, सोलापूरचे नव्हे तर सांगलीचे 
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपकडून पदवीधरसाठी देशमुखच पण, सोलापूरचे नव्हे तर सांगलीचे 

भाजप जागा राखणार का? 
राज्यात नसलेली सत्ता ही भाजपसाठी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डोकेदुखी ठरु शकते. मागील दोन निवडणुकीत या मतदारसंघातून विजय मिळविणारा भाजप यंदाच्या निवडणुकीत ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होतो का? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेची सोबत होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ती नसल्याचा काही परिणाम यावर होतो का? यासाठी तीन डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. 

भाजपकडून पदवीधरसाठी देशमुखच पण, सोलापूरचे नव्हे तर सांगलीचे 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव आज जाहीर केले आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळेल म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते. त्यामध्ये सोलापूरचे माजीमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचाही समावेश होता. पक्षाने देशमुखांनाच उमेदवारी दिली आहे. पण, ते देशमुख सोलापूरचे नव्हे तर सांगलीचे आहेत. रोहन देशमुख यांना डावलून पक्षाने सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. मागील दोन निवडणुकीत या मतदारसंघातून माजीमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळविला होता. मागील दोन निवडणुकांची व आताची स्थिती वेगळी आहे. भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाही आता त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे ही जागा मिळविणे पक्षासाठी कसोटीचे ठरणार आहे. भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला देशमुख यांच्यारुपाने उमेदवारी दिली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघावर दावा सांगणारे संग्राम देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांना पक्षाने दिलेला शब्द पूर्ण केल्याचे त्यांना दिलेल्या उमेदवारीवरुन स्पष्ट होते. 

सोलापूरचे माजीमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन यांनीही पदवीधर मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी त्यांनी विशेष मोहिमही राबविली होती. त्यांच्या लोकमंगल समुहातील कर्मचाऱ्यांना पदवीधरांची नोंदणी करण्याचे काम काहीकाळ दिले होते. काहीही झाले तरी यावेळी पक्ष आपला विचार करेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, सांगलीच्या देशमुखांना पक्षाने उमेदवारी दिल्याने रोहन देशमुखांना गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. रोहन यांच्याशिवाय पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. त्यांनी तर उमेदवारी न मिळाल्यास "मनसे'त जाण्याची तयारीही त्यांनी केली होती. आता सांगलीच्या देशमुखांना उमेदवारी दिल्याने कुलकर्णी नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. पुण्याच्या राजेश पांडे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, तेही उमेदवारी मिळविण्यास अपयशी ठरले आहेत.