वाहन उद्योगातील मंदीने विकासाला ब्रेक

कैलास रेडीज
शुक्रवार, 19 जुलै 2019

वितरण व्यवस्थेत ५० लाख नोकऱ्या 
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशनचे (एफएडीए) देशभरात १५ हजार डीलर आहेत. त्यांचे २६ हजार आउटलेट्‌स आहेत. वाहन विक्रीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या या महाकाय वितरण व्यवस्थेत जवळपास २५ लाख थेट रोजगार आणि २० ते २५ लाख अप्रत्यक्ष असे सुमारे ५० लाख रोजगार आहेत. या वितरण व्यवस्थेतील उलाढाल वार्षिक तीन लाख कोटींची आहे.

मुंबई - रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत. परिणामी कंपन्यांनी उत्पादन कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनात सात टक्के वाटा असलेल्या या उद्योगातील मंदी अशीच कायम राहिल्यास चालू वर्षात विकासदराला किमान एक टक्‍क्‍याचा फटका बसेल, अशी भीती व्यक्त होत आहे. 

जानेवारीपासून वाहन उद्योगापुढील अडचणींचा डोंगर वाढत आहे. लोकसभेच्या निवडणुका, इंधन दरवाढ, वाहन विम्याची नवीन नियमावली, कर्जदर व कर संरचनेमुळे वाहनांची झालेली दरवाढ आणि ‘एनबीएफसी’ कंपन्यांचे संकट, रोकड टंचाई यांसारख्या अडथळ्यांमुळे वाहन उद्योगाची दमछाक झाली आहे. वाहन उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चरर्स’च्या पहिल्या तिमाहीतील ताज्या अहवालानुसार दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहने या सर्वच श्रेणींतील वाहनांच्या विक्रीत घसरण झाली आहे. उर्वरित तीन तिमाहीत वाहन विक्रीत वाढ झाली नाही, तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देशाच्या ‘जीडीपी’वर किमान पाऊण टक्का ते एक टक्का परिणाम होईल, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चरर्सचे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले.

मोटारींच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने बाजारातील शिल्लक साठा वाढला असून, वितरकांसाठी आणि कंपन्यांसाठी ती नवी डोकेदुखी बनली आहे. मारुती, महिंद्रा यांसारख्या कंपन्यांनी उत्पादनात कपातीचा मार्ग पत्कारला आहे. याचा फटका कंत्राटी कामगारांना बसला आहे. या उद्योगात सुमारे पाच लाख कामगार असून, त्यांतील अनेकांच्या भवितव्याचा प्रश्‍न यातून उभा राहू शकतो. 

वाहन उत्पादनातील घट (एप्रिल ते जून तिमाही) 
२०१८-१९ - २०१९-२० - घट (टक्के) 
७२१५५१३ - ८०६४७४४ - १०.५३ 
(स्रोत - वाहन आणि सियाम आकडेवारी) 

वाहन उद्योगाचा जीडीपीतील हिस्सा 
वाहन उद्योगाचा ‘जीडीपी’मध्ये सात टक्के हिस्सा आहे. या क्षेत्रात वाहन उत्पादक आणि अस्सल सुटे भाग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या क्षेत्रात सुमारे आठ लाख कोटींची उलाढाल असून साडेतीन कोटींहून अधिक रोजगार आहेत. पहिल्या तिमाहीत वाहन विक्रीत सरासरी १२ टक्के घसरण झाली आहे. 

चार महिन्यांपासून विक्रीत १५ ते १८ टक्के घसरण झाली आहे. वाहन विक्री कमी होण्यामागे कारणे आहेत. बॅंकांकडून वाहन कर्जाची प्रक्रिया कठोर झाली आहे. कागदपत्रांची काटेकोर छाननी केली जाते. परिणामी, विक्रीत अडथळा निर्माण झाला आहे; मात्र चौकशींचे कॉल वाढले आहेत. चौकशीनंतर साधारण महिना-दीड महिन्यात ग्राहक खरेदीचा निर्णय घेतो, त्यामुळे आगामी गणेशोत्सव आणि दिवाळीत विक्री वाढले असे संकेत आहेत. 
- अमर सेठ, प्रमुख, शमन ग्रुप 

आर्थिक मंदीने ग्राहक हैराण आहे. जानेवारीपासून विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुचाकींच्या किमतींमध्ये १० ते २० टक्के वाढ झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. आता प्रत्येकाला किमान पाच वर्षांचा विमा काढावा लागतो, त्यामुळे ग्राहकाला विम्याचा जादा खर्च पेलावा लागतो. एप्रिल-मेमधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर बाजारात प्रचंड मंदी आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत काही महिन्यांपासून विक्री निम्म्याने कमी झाली आहे. 
- संतोष धोबी, प्रमुख, आर्यन ऑटो, माहीम 

वाहन विक्री कमी होण्याची अनेक कारणे आहेत. इंधन दरवाढ हे एक कारण असू शकते; मात्र गेल्या सहा महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. जानेवारीत पेट्रोलचा दर ७५.५२ रुपये, तर डिझेल ६५.७५ रुपये होता. आता जुलैमध्ये पेट्रोल ७९.९२ रुपये आणि डिझेल ६९.४३ रुपये आहे. सरकार विजेवरील मोटारी, इथेनॉलसारखी जैवइंधने, सीएनजी आदी वाहनांना प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्याचा परिणाम वाहन विक्रीवर झाला असू शकतो. 
- उदय लोध, अध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development break by Vehicle Business Recession