esakal | 'होय! आम्ही वर्षभरापासून रस्त्यावरच, आमची पुन्हा तयारी'; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

fadanvis thackeray

लॉकडाउन विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्यांनी जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

'होय! आम्ही वर्षभरापासून रस्त्यावरच, आमची पुन्हा तयारी'; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असली तरी, ही संसर्गवाढ रोखून लॉकडाउन टाळण्यासाठी ‘स्वयंशिस्त पाळा, नियमांचे पालन करा आणि लॉकडाउन टाळा’, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला दिला. संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार खंबीर असून आरोग्य सुविधा अजिबात कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्र्यांनी नागरिक आणि समाजातील सर्व घटकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, विविध तज्ज्ञांशी आणि घटकांशी चर्चा करून दोन दिवसांत नवे निर्बंध जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्यांनी जनतेच्या मदतीसाठी, नियम पाळण्यासाठी रस्त्यावर उतरावे, कोरोनामुळे कुटुंबाचा आधार गेलेल्यांना आधार देण्यासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. या संकटात सर्वांचेच सहकार्य अपेक्षित असून राजकारण करु नये, अशी विनंतीही त्यांनी केली. यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर देशांनी लॉकडाऊनची घोषणा करताना केलेल्या मदतीची आठवणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करून दिली. तसंच आंदोलनावरून टीकेला उत्तर देताना होय आम्ही गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत असं म्हणत लोकांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. 

राज्यात लॉकडाऊन करायचा का असा प्रश्न विचारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतर देशांनी काय केलं याची माहिती दिली होती. अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला. तेव्हा अमेरिकेनं सुद्धा राजकारण नको , जीव महत्त्वाचा असं आवाहन केलं आहे. ब्राझीलमध्ये मृत्यूदर वाढलाय आणि बेरोजगारी वाढलीय. रशियात लस आलीय पण तिथली परिस्थितीही वेगळी नाही. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे. तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन कऱण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या आहेत. तर हंगेरी, डेन्मार्क मध्येही अशीच परिस्थिती असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. 

हे वाचा - लॉकडाउन आज जाहीर करत नाहीय - उद्धव ठाकरे

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची. तसंच तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा असल्याचं फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल असा सल्लाही फडणवीसांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या देशांनी कडक निर्बंध लादले त्यांनी किती मदत केलीय याची आकडेवारीच मांडली आहे. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय...
आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत...
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय...
फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत...
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय...
बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय...
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय...
पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे...
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...
डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती...
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज...
ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत...
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत !
फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला...
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले...
हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’...
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...

हे वाचा - मास्क न वापरण्यात कसलं शौर्य; नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.  

loading image