फडणवीस आज दुपारी 'वर्षा' सोडणार; आवराआवर सुरु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

वर्षा बंगल्यावर मावळत्या मुख्यमंत्र्यांची आवरा आवर सुरु झाली आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांचं घरगुती साहित्य घेऊन जाण्यासाठी टेम्पो आला आहे. जवळपास 12 लोक साहित्य पॅक करण्यासाठी आले आहेत.

मुंबई : ज्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं अट्टहास केला ते मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंना मिळालंय. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसाठी ही मोठी राजकीय संधी असणार आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री ठरलाय. अब की बार उद्धव सरकार. हे निश्चित झाले आहे. आज शिवाजी पार्कवर त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

या शपथविधीसाठी देशभरात निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. एकीकडे ही लगबग सुरु असताना, तिकडे वर्षा बंगल्यावर मावळत्या मुख्यमंत्र्यांची आवरा आवर सुरु झाली आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांचं घरगुती साहित्य घेऊन जाण्यासाठी टेम्पो आला आहे. जवळपास 12 लोक साहित्य पॅक करण्यासाठी आले आहेत.

महाराष्ट्रात 12 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. त्यामुळे मंत्र्यांना आपले बंगले रिकामे करावे लागले होते. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम आणखी तीन महिने वर्षा बंगल्यातच राहील असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना बंगला खाली करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.  मात्र 23 नोव्हेंबरला रातोरात राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि राज्यातील सत्तासमीकरणे बदलली.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि कोर्टाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र त्यापूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार अवघ्या चार दिवसात कोसळलं.

आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून ओळख असलेला वर्षा बंगला आता त्यांना मिळणार आहे. त्यामुळे मावळत्या मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला खाली करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरही वर्षा बंगला सोडण्याबाबतचे विनोद व्हायरल होत होते. अखेर आता देवेंद्र फडणवीसांना आवराआवर सुरु केली आहे.

 ग्रँड शपथविधी- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा  पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis to leave varsha bungalow