फडणवीसांकडून खोटा व्हिडिओ ट्विट; राज्याची मान खाली जाते म्हणत काँग्रेस आक्रमक

टीम ई सकाळ
Wednesday, 18 December 2019

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फेक व्हिडीओ ट्विटरवर टाकतात. फडणवीसजी, कदाचित हे करणं तुम्हांला सांगितलं गेलं असेल. पण, राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी असं केलं की मान राज्याची खाली जाते. कृपया राज्याच्या हितासाठी असं करू नका.'

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक फेक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निषाणा साधला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सातव म्हणाले, 'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फेक व्हिडीओ ट्विटरवर टाकतात. फडणवीसजी, कदाचित हे करणं तुम्हांला सांगितलं गेलं असेल. पण, राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी असं केलं की मान राज्याची खाली जाते. कृपया राज्याच्या हितासाठी असं करू नका.'

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. महाराष्ट्रातही या कायद्यावरून रान पेटण्याची शक्यता आहे. कारण, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हडिओवरून काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्हिडिओवरून निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही विद्यार्थी 'हिंदुओं की कबर खुदेगी' असे नारे देताना दिसत आहेत. तसंच या व्हिडिओवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. 'अशा आंदोलनांना प्रोत्साहन देऊन शिवसेनेनं आता स्पष्ट केलं आहे की वैयक्तिक लोभांच्या बाबतीत तडजोडी करण्यास शिवसेना किती प्रमाणात खाली उतरली आहे', असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते.

देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ एका फॅक्ट चेकिंग वेबसाईटने हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. याच वेबसाईटचा आधार घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 'नैराश्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, हे पाहून वाईट वाटलं. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे. माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी द्वेषपूर्ण आणि बनावट माहिती पसरवणं टाळलं पाहिजे,' असं ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis Posting Doctored Videos Out Of Desperation says Congress