पवार X फडणवीस : महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य ठरवणारी ‘लढाई’

भाजपाचे हे डावपेच यशस्वी झाल्यास देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ ठरणार आहेत.
Devendra Fadnavis vs Sharad Pawar
Devendra Fadnavis vs Sharad Pawarsakal

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष चिघळला असून एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये. हा बंड शिवसेनेतील अंतर्गत विषय असला तरी या लढ्याला शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस वादाची किनार आहे. देवेंद्र फडणवीसांना धक्का देत शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दणका दिलाय. आता शिवसेनेतील बंडवीरांना छुपा पाठिंबा देत देवेंद्र फडणवीस पवारांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचं सरकार पाडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपाचे हे डावपेच यशस्वी झाल्यास देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ ठरणार आहेत. (Devendra Fadnavis vs Sharad Pawar)

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड करत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दणका दिलाय. महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेत केला आहे. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंचा गट असून समर्थकांना संबोधित करताना एकनाथ शिंदेंनी राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा आहे, असं विधान केलं होतं. यावरुन बंडवीरांना भाजपाचा छुपा पाठिंबा असल्याचं उघड झालंय. याशिवाय दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची वडोदरा येथे गुप्त बैठक झाल्याचे समजत आहे. फडणवीसांशी चर्चा करुन दिल्लीतून ही सूत्र हलतायंत, असं दिल्लीतील एका पत्रकाराने सांगितले.

पवारांचं ‘चेकमेट’

गेल्या चार वर्षांपासून राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशी लढाई सुरूये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येईन असं म्हटले होते. तर शरद पवारांनी फडणवीसांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी कंबर कसली. निकालानंतर शरद पवार यांनी शिवसेनेला सोबत घेतले. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार हे निश्चित झाले असतानाच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी उरकला. मात्र, फडणवीसांना पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांच्या गटाने अवघ्या काही तासांमध्ये यूटर्न घेतला आणि फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री ठरले.

फडणवीसांचा ‘करारा जवाब’

शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार सत्तेत आहे. तर सर्वाधिक जागांवर बाजी मारुनही भाजपावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. यानंतर फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करणे हे चुकलेच, असे मान्य केले होते.

पराभवानंतर फडणवीस शांत बसले नाहीत. महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी फडणवीसांनी सोडली नाही. गेल्या २० दिवसांमध्ये फडणवीसांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडत भाजपाला विजय मिळवून दिला. आता फडणवीसांनी शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेवर शेवटचा वार केलाय. हा डाव यशस्वी झाल्यास उद्धव ठाकरेंसाठी हादरा तर आहेच, पण सरकार पडल्यास हा शरद पवारांचाही पराभव मानला जाईल. आता पुढे काय होणार, हे स्पष्ट झाले नसले तरी विजय झाल्यास फडणवीस राज्याच्या राजकारणातील चाणक्य ठरतील हे मात्र निश्चित.

फडणवीस X पवार

कमी वयात मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील दुसरे नेते आहेत. फडणवीस हे वयाच्या ४४ वर्षी मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी पाच वर्षांची टर्म पूर्ण केली होती. या कालावधीत त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना स्पर्धेतून बाहेर काढले. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने चौकशीचा ससेमिरा लावत विरोधकांचाही ‘आवाज’ बंद केला.

दुसरीकडे शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. १९७८ मध्ये शरद पवार यांनी बंड करत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री (वयाच्या ३८ व्या वर्षी) म्हणून त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या शब्दाला वजन आहे. ‘बेरजेचं राजकारण’ जमल्यामुळेच शरद पवारांनी भल्याभल्या नेत्यांना धूळ चारली. चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात. शरद पवार हे माझे राजकीय गुरु असल्याचे खुद्द मोदींनीच एका कार्यक्रमात सांगितले होते. पण याच शरद पवारांना कमी लेखण्याची घोडचूक फडणवीसांनी केली. २०१९ मधील निवडणुकीने फडणवीसांना शरद पवारांनी त्यांची राजकीय ‘पॉवर’ दाखवली होती. आता एकनाथ शिंदेंच्या बंडाचं पुढे काय होणार, हे स्पष्ट झाले नसले तरी फडणवीसांचा हा डाव यशस्वी झाल्यास ते राज्याच्या राजकारणातील चाणक्य ठरतील हे मात्र निश्चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com