
Devendra fadnavis: पोरगा झाला तरी माझ्यामुळेच, ही प्रवृत्ती सोडा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतलं असं म्हणणं हस्यास्पद आहे. अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली.
नेमकं काय म्हणालेत फडणवीस?
मुख्यमंत्री महोदय मला एक गोष्ट समजलीच नाही. आपण कोणतंही काम सुरू केलं तर काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालं. अरे अडीच वर्षापैकी दोन वर्ष तर ते घरातच होते. दरवाज्याच्या आतच होते. अन् सहा महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोणतंही काम घेतलं तर आमच्याच काळात सुरू झालं असं सांगतात.
काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झालं मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे.
आता पोरगा झाला हा त्याच्या कर्तृत्वाने झालाय. लग्न केलं तर त्याच्या पसंतीने केलं. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही. म्हणून तर ही मुंबईची अवस्था झालीय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.