
Dhananjay Munde : छातीला पट्टा, चेहऱ्यावर थकवा...; डिस्चार्जनंतरचा व्हिडीओ आला समोर
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यावेळी रुग्णालयातून बाहेर येतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही समर्थकही आहेत.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. मतदारसंघातले कार्यक्रम संपवून धनंजय मुंडे परळीकडे परतत असताना हा गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या छातीला मार लागला होता.
अपघातानंतर मुंबईच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज घेऊन रुग्णालयातून बाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये त्यांनी छातीला एक पट्टा बांधला आहे. चालण्यातून अजूनही थोडा त्रास असल्याचंही दिसत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे काही समर्थकही आहेत.
धनंजय मुंडे रुग्णालयात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तसंच तब्येतीची विचारपूसही केली.