मला जग सोडून जावं वाटतंय; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

माझ्या व्हिडिओमध्ये एडिटींग करण्यात आले. क्लिपमध्ये छेडछाड करून बदनामीचा प्रयत्न केला. मी माझ्या बहिणींकडून राखी बांधून घेत होतो. काल झालेला प्रकार वेदना देणारा होता. आमचे बहिण-भावाचे नाते रक्ताचे आहे. माझ्या वक्तव्याचा अनर्थ कोणी काढला, याची मी चौकशी करणार आहे.

बीड : मलाही सख्या तीन बहिणी आहेत, तीन मुली आहेत. त्यामुळे मी कधीच बहिणींबद्दल असे बोलू शकत नाही. माझ्यावर झालेल्या आरोपानंतर मला जग सोडून जावे असे वाटत होते. बहिण-भावाच्या नात्यामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले.

भाजप महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत भाषणातून असभ्य टिपण्णी केल्याच्या आरोपावरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शनिवारी (ता. 19) रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विडा (ता. केज) येथील प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलताना काही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ऐकायला येतात. त्यावरून स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत व्हिडिओत छेडछाड करण्यात आल्याचे म्हटले आहे.

मुंडे म्हणाले, की माझ्या व्हिडिओमध्ये एडिटींग करण्यात आले. क्लिपमध्ये छेडछाड करून बदनामीचा प्रयत्न केला. मी माझ्या बहिणींकडून राखी बांधून घेत होतो. काल झालेला प्रकार वेदना देणारा होता. आमचे बहिण-भावाचे नाते रक्ताचे आहे. माझ्या वक्तव्याचा अनर्थ कोणी काढला, याची मी चौकशी करणार आहे. आमच्या नात्यात विष कालविण्याचा प्रकार करून, मला समाजात खलनायक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. मी निवडणुकांमध्ये हरलो किंवा जिंकलेलो आहे. मी कधीच एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोललेलो नाही. मताच राजकारण कधी मला करता आलेला नाही. मी माझ्या बहिणीबाबत कधीच असे बोलू शकत नाही. माझा बोलण्याचा आशय नागरिकांबद्दल होता. मी आतापर्यंत कधी खेद आणि खंत व्यक्त केलेली नाही. ज्याने कोणी हे केले आहे, त्याला जनताच न्याय देईल. मी पृथ्वीवर नसाव असे काही जणांना वाटत आहे. मला फार वेदना झाल्या आहेत. एकदा जरी बोलल्या असत्या तर मी मतदारसंघ सोडला असता. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण होणार असेल तर मला राजकारण करण्याची इच्छा नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde clarified viral video on Pankaja Munde in Beed