मुंबई - ‘भारताला जागतिक डिजिटल पेमेंट क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश बनवण्यात रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या विकासकथेच्या केंद्रस्थानी ही बँक आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी येथे काढले. रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्धापनदिन सांगता सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
स्वातंत्र्यपूर्व काळातील दारिद्र्यापासून ते आज जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश बनण्यापर्यंतच्या काळाचा संपूर्ण प्रवासाचा साक्षीदार रिझर्व्ह बँक आहे, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.
‘सर्वसामान्यांचा या बँकेशी थेट संबंध येत नसला तरी त्यांच्या बँकांमार्फत तसेच इतर मार्गांनी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार या बँकेद्वारे नियंत्रित केले जातात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आर्थिक व्यवस्थेवर सर्वजण विश्वास ठेवतात. हा विश्वास हेच या बँकेचे ९० वर्षांतील मोठे यश आहे. विकास आणि आर्थिक स्थिरता या आपल्या उद्देशांना अनुसरून वाटचाल करीत बँकेने हा विश्वास संपादन केला असल्याचे आहे,’ असे मुर्मू म्हणाल्या.
वेगाने वाढणाऱ्या आपल्या राष्ट्राच्या बदलत्या गरजांनुसार रिझर्व्ह बँकेने बदल आत्मसात केले आहेत. १९९०च्या दशकातील आर्थिक उदारीकरणापासून ते कोरोनाच्या साथीपर्यंत देशापुढील सर्व प्रमुख आव्हानांना या बँकेने समर्थ आणि वेगवान प्रतिसाद देत लवचिकतेचे आणि अनुकूलतेचे दर्शन घडवले.
जागतिक प्रतिकूल घडामोडींमध्येदेखील भारताची वित्तीय व्यवस्था समर्थ राहू शकते, हेच रिझर्व्ह बँकेने दाखविले, असे त्यांनी कौतुकाने नमूद केले. राष्ट्रपती म्हणाल्या, ‘डिजिटल व्यवहारात भारताचे जागतिक नेतृत्व सिद्ध करण्यात रिझर्व्ह बँकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‘डिजिटल पेमेंट’मधील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून डिजिटल व्यवहार सुरळीत, कार्यक्षम आणि सुरक्षित असल्याचे या बँकेने निश्चित केले आहे. ‘यूपीआय’मुळे वित्तीय क्षेत्रात क्रांती झाली असून कमी खर्चात जलद व्यवहार आणि सर्वांसाठी अर्थव्यवस्था खुली होणे हे हेतू साध्य झाले. त्याहीपलीकडे जाऊन बँकेने फिनटेक यंत्रणा म्हणजेच आर्थिक व्यवहारांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या परिसंस्थेला विकसित केले आहे.
विकासाचे ध्येय
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, ‘आपल्या देशाचा आर्थिक परीघ आणि आर्थिक सामर्थ्य निश्चित करण्यात आगामी दशक महत्त्वाचे ठरेल. सर्वसमावेशक आर्थिक विकास हे आपले ध्येय राहील. ग्राहक सेवा आणि ग्राहक संरक्षण यात विकास करून ती यंत्रणा सक्षम करू.’
आधारस्तंभ म्हणून काम करेल!
‘विकसित भारत २०४७ नुसार एका नवीन अनुकूल आणि सर्वांसाठी उपलब्ध अशा वित्तीय परिसंस्थेच्या क्षेत्रात देश प्रवेश करीत आहे. या मार्गातील प्रश्न आणि आव्हाने जटिल असू शकतात; मात्र स्थैर्य, नवकल्पना आणि सर्वसमावेशकतेसाठी भारतीय रिझर्व्ह बँक आधारस्तंभ म्हणून काम करेल आणि भारताला अधिक समृद्ध भविष्याकडे नेईल, असा विश्वास मुर्मू यांनी व्यक्त केला.
चलनविषयक स्थिरता आणि आर्थिक स्थैर्याची संरक्षक या नात्याने ही बँक देशाची मजबूत बँकिंग प्रणाली उभारेल. आर्थिक नवकल्पनांना चालना देऊन आर्थिक परिसंस्थेवरील विश्वासाचे रक्षण करेल, त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.