'सुप्रियाताईंच अभिनंदन, त्याच शरद पवारांच्या खऱ्या वारसदार'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

काल घडलेल्या घडामोडींमुळे पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांची समस्याही सुटली आहे. सुप्रियाताईंना शुभेच्छा!!, दिग्विजय सिंह यांनी असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिल्ली : अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. शरद पवारांनी अजित पवारांना विधिमंडळ नेतेपदावरून हटवल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. यावर ट्वीट करत काॅंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी खासदार सुप्रिया सुळे याच शरद पवार यांच्या राजकीय वारसदार असल्याचे सांगितले आहे.  

दरम्यान, भाजप व अजित पवार यांच्या घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत सांगितलं की, या राजकीय चढाओढीत अजित पवार एकटे पडणार आहेत. राष्ट्रवादीचे 54 पैकी 53 आमदार हे शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे अजित पवार हे एकटेच राहतील. तसेच पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांची समस्याही सुटली आहे. सुप्रियाताईंना शुभेच्छा!!, दिग्विजय सिंह यांनी असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

तसेच अजित पवारांना समर्थन दिलेले आमदार काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले होते. त्या सर्वच आमदारांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु त्यातील पाच आमदार गायब असल्याचं नंतर नवाब मलिक म्हणाले होते. इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे हे बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून जोरदार फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपला बहुमत चाचणीत पराभूत करु, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. यापुढील काळात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून साम, दाम, दंड, भेद यांचा उपयोग करुन आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digvijay singh on supriya sule congratulatory tweet to her