'तंत्रशिक्षण'चे संचालक म्हणाले..! एम-फार्मसी, डी-फार्मसीच्या विद्यार्थ्यांनो प्रवेशासाठी तयार ठेवा 'ही' कागदपत्रे

1car01_10_0.jpg
1car01_10_0.jpg

सोलापूर : दहावी-बारावीचा निकाल आता काही दिवसांत लागणार असून सीईटीची परीक्षा होईल. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दहा प्रकारची कागदपत्रे तयार ठेवावीत, असे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामध्ये नॉन क्रिमिलेअर, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागास असलेले प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक प्रमाणपत्रासह दहा प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे. प्रवेशासाठी ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक असल्याचा आदेश तंत्रशिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी काढला. मात्र, लॉकडाउनमध्ये कागदपत्रे काढायची कशी, याची विद्यार्थ्यांना चिंता लागली आहे. 

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी औषधनिर्माणशास्त्र, एचएससीटी सरफेस कॅटिंग टेक्‍नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम, तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड कॅटरिंग टेक्‍नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष वास्तूशास्त्र, बी. प्लॅनिंग पदवी अभ्यासक्रम, प्रथम वर्ष एमई तथा एम-टेक., एम-फार्मसी, डी- फार्मसी, एमएमसीएस, एमसीए या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना दहा प्रकारची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. मात्र, मार्चपासून राज्यात लॉकडाउन असल्याने सध्या 15 टक्‍के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळविणे कठीण झाले आहे. 

'तंत्रशिक्षण'च्या संचालकांचा इशारा 
2016-17 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी बनावट जात व जातवैधता प्रमाणपत्र सादर केली होती. ही बाब कागदपत्रांची पडताळणी करताना समोर आली. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे जोडताना याची काळजी घ्यावी आणि सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचीच कागदपत्रे सादर करावीत, अशा सक्‍त सूचना तंत्रशिक्षण विभागाचे संचालाक डॉ. अभय वाघ यांनी केल्या आहेत. अन्यथा फौजदारी कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

डिजिटल स्वाक्षरीचे मिळणार जातवैधता प्रमाणपत्र 
दरवर्षी जातवैधता प्रमाणपत्र मागणीसाठी लाखो अर्ज जात पडताळणी समितीकडे प्राप्त होतात. मनुष्यबळ कमी असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना वारंवार प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागतात. या पार्श्‍वभूमीवर आता राज्यस्तरावर नवी वेबसाईट तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु झाले आहे. त्यानुसार आता डिजिटल स्वाक्षरीचे जातवैधता प्रमाणपत्र घरबसल्या मिळणार आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बैठकही पार पडली असून दोन महिन्यात हा नवा प्रयोग राज्यभर राबविला जाईल, असा विश्‍वास सोलापूर जात पडताळणी कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकृष्ण मोटे यांनी व्यक्‍त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com